उस्मानाबादमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या मुला - मुलींचा अनोखा विवाह सोहळा, लग्नात एसटीच्या संपाचे लागले पोस्टर, 'एसटी माझी माय माऊली' असा मजकूर , पहा फोटो

Unique wedding ceremony in Osmanabad : लग्न हॉलमध्ये लावलेल्या भल्या मोठ्या LED वॉलवर विविध मीडियाने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला दिलेले कव्हरेज दाखवून त्यामधून कर्मचाऱ्यांच्या व्यथाचे व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आल्या.

Unique wedding ceremony in Osmanabad
लग्नात एसटीच्या संपाचे लागले पोस्टर, 'एसटी माझी माय माऊली'   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एसटी ही सर्वसामान्यसाठी कशा पध्दतीने आवश्यक आहे हा संदेश देण्यात आला
  • "खचून नका जाऊ लेकरांनो करू नका आत्महत्या, माझीच होत आहे हत्या ! भावनिक आवाहन
  • लग्नात मधूर स्वरात गाण्यात येणाऱ्या मंगलाष्टका मध्ये ही एसटीच्याच समावेश

Unique wedding ceremony in Osmanabad । उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर आगार येथे मेकॅनिक पदावर कार्यरत असलेल्या नागनाथ झाडपिडे याचे सुपुत्र शुभम आणि कंडक्टर पदावर कार्यरत असलेले गोपीनाथ परमाळ याची कन्या नम्रता याचा अनोखा विवाह सोहळा पार पडला. राज्यात सध्या एसटी कर्मचारी यांचा संप सुरू असताना त्याला पाठिंबा म्हणून एसटी कर्मचारी यांच्या मुला - मुलींचा अनोखा विवाह सोहळा तुळजापूर येथे पार पडला. यामध्ये एसटी कर्मचारी यांच्या लढा विलीनीकरण आंदोलनाला पाठींबा देण्यात येत जनजागृती करण्यात आली. 

एसटी ही सर्वसामान्यसाठी कशा पध्दतीने आवश्यक आहे हा संदेश देण्यात आला

प्रवेशद्वारावर एसटी बसची प्रतिकृती उभी करून त्यावर 'एसटी माझी माय माऊली' असा मजकूर टाकून एसटी ही कर्मचाऱ्यांसाठी 'माय माऊली' असल्याचा विश्वास पूर्ण संदेश देत वऱ्हाडी मंडळीचे दोन्ही वधूवर मंडळीकडून स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर एसटी महामंडळाचे कर्मचारीचा संप सुरू आहे म्हणून संपकरी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आपल्या मुला - मुलीच्या लग्नात एसटी ही सर्वसामान्यसाठी कशा पध्दतीने आवश्यक आहे हा संदेश देण्यात आला. त्याचबरोबर संपूर्ण हॉलमध्ये एसटीचे विविध फ्लेक्स व बॅनर लावण्यात आले यामध्ये आंदोलन दरम्यान शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजलीचे  बॅनर लावण्यात आले. 

"खचून नका जाऊ लेकरांनो करू नका आत्महत्या, माझीच होत आहे हत्या ! भावनिक आवाहन

दरम्यान , संपकरी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी "खचून नका जाऊ लेकरांनो करू नका आत्महत्या, माझीच होत आहे हत्या ! असे भावनिक आवाहन करणारा अर्थपूर्ण संदेश देत संपकरी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांना इच्छित स्थळी पोहोचवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या इच्छा कधी पूर्ण होणार? एसटी तर्फे प्रवाशाना दिल्या जातात अनेक सुविधा परंतु एसटी कर्मचाऱ्यांसाठी काय ? असा सवाल शासनाला बॅनरच्या माध्यमातून विचारला आहे. 

लग्नात मधूर स्वरात गाण्यात येणाऱ्या मंगलाष्टका मध्ये ही एसटीच्याच समावेश

एसटी महामंडळ बरखास्त करून कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या अशी शासनाला विनंती बॅनरच्या माध्यमातून केली आहे. या सर्व गोष्टीचा वऱ्हाडी मंडळीला वेगळाच अनुभव कमी की काय म्हणून लग्नात मधूर स्वरात गाण्यात येणाऱ्या मंगलाष्टका मध्ये ही एसटीच्याच समावेश आल्याने उपस्थित वऱ्हाडी मंडळीच्या भुवया उंचावल्या व त्यांना एसटीचे महत्व व व्यथा सांगितली गेली. दरम्यान, एसटी ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांच्या वाहतूकची जीवनवाहिनी असल्याने हा संप फक्त कर्मचाऱ्यांचा नसून हा लढा सर्वसामान्यचा आहे त्यामुळे एसटी वाचली पाहिजे असे मत मांडले आहे.

 

कर्मचाऱ्यांच्या व्यथाचे व्हिडीओ क्लिपही दाखवण्यात आल्या

लग्न हॉलमध्ये लावलेल्या भल्या मोठ्या LED वॉलवर विविध मीडियाने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला दिलेले कव्हरेज दाखवून त्यामधून कर्मचाऱ्यांच्या व्यथाचे व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आल्या तसेच हे कमी होते की काय नवऱदेवाने आणि नववधूने उखानेही एसटीचेच घेतले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी