गोपीनाथ गडाचे दर्शन घेणे भाजपाच्या नवनिर्वाचित आमदाराला पडले महागात; गुन्हा दाखल!

औरंगाबाद
Updated May 22, 2020 | 10:36 IST | अजहर शेख

जिल्हाधिकारी यांचा आदेश झुगारून जमाव करून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदारांसह २० ते २२ जणांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visiting Gopinath Fort cost the newly elected BJP MLA dearly; Crime filed!
गोपीनाथ गडाचे दर्शन घेणे भाजपाच्या नवनिर्वाचित आमदाराला पडले महागात; गुन्हा दाखल!  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • आमदार रमेश कराड यांनी गोपीनाथ गड येथे पोलीस प्रशासनास कसलीही पूर्व कल्पना न देता अचानकपणे दर्शनास येऊन लोक जमा केले.
  • बीडमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने झोन निश्चित
  • सुरेश धस यांच्यावरही गुन्हा नोंद झाला होता.

बीड : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील गोपीनाथ गड (पांगरी कॅम्प) येथे भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे सदस्य रमेश कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांचा आदेश झुगारून जमाव करून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदारांसह २० ते २२ जणांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस नाईक विष्णू घुगे यांनी दिली फिर्याद

दरम्यान, या घटनेची फिर्याद पोलीस नाईक विष्णू सुबराव घुगे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटल्याप्रमाणे आमदार रमेश कराड यांनी गोपीनाथ गड येथे पोलीस प्रशासनास कसलीही पूर्व कल्पना न देता अचानकपणे दर्शनास येऊन लोक जमा केले. यावेळी त्यांच्या समवेत भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. शालिनी कराड, डॉ. बालासाहेब कराड, जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, दिनकर मुंडे,  (सर्व रा.परळी),  विठ्ठल मुंडे (रा.लिंबोटा) यांच्यासह १० ते १५ लोक होते. या सर्वांनी जीवितास धोका असलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग पसरेल ही माहिती असतानाही जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी आदेशाचे आणि  प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्या विरोधात वरिष्ठांच्या सूचनेवरून घुगे यांनी फिर्याद नोंदवली. 

या कलमानुसार गुन्हा दाखल

विधान परिषदेचे सदस्य यांच्यासह अन्य लोकांवराती  कलम १४३, १८८, २६९, २७०, २७१, भादवीसह कलम ५१ (ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाणे करत आहेत.

यापूर्वी सुरेश धस यांच्यावरही गुन्हा नोंद झाला होता

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने कन्टेन्मेंट झोनमध्ये बंदी घातली आहे. मात्र, आमदार सुरेश धस यांनी यामध्ये येत नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. यामुळे त्यांनी संचारबंदीचे आदेश मोडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी मधील पाटण सांगवी या कंटेन्मेंट झोन परिसर म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात सुरेश धस यांनी प्रवेश केला होता. यापूर्वी देखील ऊसतोड कामगारांना सोडवण्यासाठी जिल्हा बंदी डावलून गेल्याप्रकरणी धस यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

बीडमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने झोन निश्चित

दरम्यान बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळू लागल्याने झोन निश्चित करण्यात आले आहेत. झोन निश्चित करण्याची जबाबदारी राज्य सरकारांकडे देण्यात आली आहे. यानुसार राज्ये त्यांच्या जिल्ह्यातील झोन निश्चित करणार आहेत. बीडमध्येही कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. यामुळे बीड शहरामध्ये कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत.  या झोन मध्ये प्रवेश करणे आमदार सुरेश धस यांना भोवले होते.

बीड जिल्ह्यात कोरोनाचा पाहिला बळी

बीडच्या आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या ६५ वर्षीय महिलेचा पहाटे मृत्यू झाला. कालच तिच्यासह सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. संबंधित महिला ही मूळची नगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील रहिवासी होती. ती मुंबईहून सांगवी येथे नातेवाईकांकडे आली होती. बीडमध्येच त्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील हा कोरोनाचा पहिला बळी ठरला. उपचारादरम्यान आज पहाटे या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी