जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे स्थानिक नेते मूग गिळून गप्प का? – आमदार राणा पाटील आक्रमक

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Apr 18, 2021 | 23:26 IST

Why are local leaders silent? - MLA Rana Patil aggressive: पाटील यांनी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर, व्हाट्स अॅपवर काळ्या रंगाचा डीपी / स्टेटस ठेवावा - पाटील

Why are local leaders silent? - MLA Rana Patil aggressive
स्थानिक नेते मूग गिळून गप्प का? – आमदार राणा पाटील आक्रमक   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे स्थानिक नेते मूग गिळून गप्प का? – आमदार पाटील
  • इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उस्मानाबादला अत्यंत कमी प्रमाणात रेमिडिसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा
  • अक्षम्य दुर्लक्षाबाबत उस्मानाबादकर सत्ताधाऱ्यांना कदापीही माफ करणार नाही.

उस्मानाबाद : भारतीय जनता पार्टीचे तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोशल मीडिया वरती पोस्ट शेअर करीत राज्य सरकारवरती निशाणा साधालां आहे. मनाची नाही तर जनाची तरी लाज वाटू द्या : या निष्क्रिय राज्य सरकारला उस्मानाबादकर कदापीही माफ करणार नाहीत! असं आमदार पाटील यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे स्थानिक नेते मूग गिळून गप्प का? – आमदार पाटील

उस्मानाबाद जिल्ह्यातील कालच्या उपलब्ध आकडेवारी नुसार कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २९,०७७ झाली असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ५,७९५ आहे. कालपर्यंत जिल्ह्यात ६९३ कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे. महाविकास आघाडी सरकारने कोरोना महामारीच्या अभूतपूर्व आपत्कालीन काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. जिल्ह्याने शिवसेनेचे ३ आमदार व १ खासदार निवडून दिले आहेत. तरीही जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे स्थानिक नेते मूग गिळून गप्प का आहेत? असा सवाल देखील राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थित केला आहे.

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उस्मानाबादला अत्यंत कमी प्रमाणात रेमिडिसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा

जिल्हाभरात २,५०० चाचण्या झाल्या, त्यातून ६५३ नवीन रुग्ण काल एका दिवसात सापडले, तर २० कोरोना बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उस्मानाबादला अत्यंत कमी प्रमाणात रेमिडिसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. उमरगा, तुळजापूर, परांडा या उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी तर अनेक दिवसांपासून पुरवठाच होत नाही. जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथेही गरजेच्या ५०% देखील पुरवठा होत नाही. जिल्हा रुग्णालय आवारातील ऑक्सिजन प्लांट काही महिन्यांपूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित असताना काल कसे बसे याचे काम पूर्ण झाले. जिल्हाभरात डॉक्टरांचा तुटवडा जाणवत आहे, रुग्णांना अॅडमिट करून घेण्यासाठी बेड शिल्लक नाहीत अशी आरोग्य यंत्रणेची बिकट अवस्था झालेली आहे. रुग्ण सापडल्यानंतर त्या परिसरात मायक्रो कंन्टेन्टमेन्ट झोन तयार करणे, संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग, टेस्टिंग आणि विलीगीकरण करणे व इतर अनुषंगिक गोष्टी योग्य पद्धतीने होताना दिसत नाहीत. असं पाटील यांनी म्हटलं आहे.

अक्षम्य दुर्लक्षाबाबत उस्मानाबादकर सत्ताधाऱ्यांना कदापीही माफ करणार नाही.

अशा अभूतपूर्व परिस्थितीत राज्य सरकार व राज्य सरकारचे प्रतिनिधी असलेल्या पालकमंत्र्यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे गरजेचे असते. २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्री पुन्हा जिल्ह्यात येऊ शकले नाहीत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री आजारातून बरे होई पर्यंत इतर मंत्री महोदय उस्मानाबाद जिल्ह्यासाठी प्राधिकृत करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती केली होती. मात्र यानंतरही जिल्ह्यात कोणतेही मंत्री आले नाहीत. इतर जिल्ह्यात पालकमंत्री दर आठवड्याला बैठका घेऊन जनतेच्या व प्रशासनाच्या अडचणी जाणून घेतात, त्या सोडविण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करतात. या आणीबाणीच्या काळात एकाही मंत्र्यांनी जिल्ह्यातील अडचणींबाबत येथे येऊन आढावा घेतलेला नाही. सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्यामुळे जनता वैतागलेली आहे. या अक्षम्य दुर्लक्षाबाबत उस्मानाबादकर सत्ताधाऱ्यांना कदापीही माफ करणार नाही. 

काळ्या रंगाचा डीपी / स्टेटस ठेवून निषेध व्यक्त करण्याचे आवाहन

दरम्यान, पाटील यांनी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर, व्हाट्स अॅपवर काळ्या रंगाचा डीपी / स्टेटस ठेवून निषेध व्यक्त करावा. असे आवाहन देखील केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी