पोलिसाने बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप, उस्मानाबाद जिल्ह्यातील धक्कादायक घटना

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jan 26, 2020 | 21:11 IST

पोलीस कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. पीडित महिलेने केलेल्या या आरोपाने एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.

woman blamed policeman raped osmanabad maharashtra crime news marathi
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

उस्मानाबाद: पोलीस कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. पीडित महिला ही उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील निवासी आहे. या महिलेला त्यांच्याच समाजातीलच एका युवकाने फूस लावून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पळवून नेले होते आणि तेथे त्या महिलेवर अत्याचार देखील करण्यात आले होते.

महिलेची शोधाशोध करून महिला सापडत नसल्याने तिच्या घरच्या मंडळीने आपली कैफियत पोलिसाकडे मांडली आणि पोलिसांनी त्या महिलेचा शोध सुरू केला. ज्या पोलीस कर्मचाऱ्याकडे तपास दिला होता त्या पोलीस कर्मचाऱ्याने त्या महिलेशी आणि तरुणाशी संपर्क साधून त्यांना वाशी जवळ एका ठिकाणी बोलावले. यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने त्या तरुणाला तेथून निघून जाण्यास सांगितले त्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याने महिलेला आपल्या गाडीत बसवून वाशी येथे आणले. मी त्या युवकावर मोठी केस करतो असे सांगून पोलीस कर्मचाऱ्याने तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे समजले आणि तिने थेट पोलीस अधिक्षकांचे कार्यालय गाठले. पीडित महिलेने आपली तक्रार पोलीस अधिक्षकांकडे दिली आहे. 

पीडित महिलेने सांगितला घटनाक्रम

पीडित महिलेने सांगितले की, मीच त्या युवकाला फोन करून तूला घेऊन ये अस पोलिसांनी सांगितले होते आणि मला बबन जाधवर (पोलीस कर्मचाऱ्याचे नाव) यानी त्यांच्या सोबत आणलेल्या पांढ-या रंगाच्या कारमध्ये बसवून वाशी येथे पोलीस स्टेशनच्या पाठीमागे रोडजवळ असलेल्या एका खोलीमध्ये आणून ठेवले. तेथे मला पोलीस बबन जाधवर साहेब यांनी गणेश काळे याचेवर मोठी केस करतो असं सांगून माझ्यावर रात्रभर बलात्कार केला. हा रात्रीचा घडलेला प्रकार कोणाला सांगू नको नाहीतर मी तुला तझ्या केसमध्ये काही मदत करणार नाही असं सांगितलं. त्यामुळे मी घाबरून याची कोठेही वाच्यता केली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. ७/१/२०२० रोजी स्टेट बँक ऑफ वाशी येथे जावून दोन कोऱ्या स्लिप घेऊन आले आणि सोबत बँकेतील दोन साहेबांना घेऊन आले. त्यांना सांगितले की, मला चालता येत नाही, तिच्या नावावरील पैसे काढायचे आहेत असे म्हणून त्याने माझे उजव्या पायावर चादर टाकून बँकेच्या साहेबांनी त्याचे फोटो काढले आणि माझ्या हस्ताक्षरात स्लिप भरून घेऊन त्याच्यावर माझ्या सह्या घेतल्या. त्यानंतर अॅटोरिक्षा बोलावून मला भूम येथे पाठवून दिले. बबन जाधवर साहेब भूमपर्यंत आमच्या रिक्षाच्या पाठीमागे आले होते. तेथे परत मला गणेश काळे याच्यासोबत बबन जाधवर साहेबांनी पाठवून दिले. तेथून मला गणेश काळे हा परत कोल्हापूर येथे बसने घेऊन गेला.

पीडित महिलेने पुढे सांगितले की, कोल्हापूर येथे गणेश काळे मला सतत मारहाण करत होता. त्यामुळे वैतागून दि.१९/०१/२०२० रोजी मी रेल्वेत बसून पळून बार्शीला आले. परत बसने मी दसमेगाव येथे आले. मला माझी सासू यांनी सांगितले की, “वाशी पोलीस स्टेशनचे साहेब बबन जाधवर यांनी तुला शोधण्यासाठी माझ्याकडून १५०००/- रूपये घेतले होते." यामुळे मी आणि माझी सासू उस्मानाबाद येथे येऊन एस.पी. साहेबांना अर्ज दिला होता. एस.पी. साहेबांनी फोन करून वाशी पोलीस स्टेशनला माझी तक्रार घ्या असे सांगितले होते. मी दि.२२/१/२०२० रोजी दिवसभर वाशी पोलीस स्टेशनला बसून होते. रात्री माझी तक्रार घेत असताना चोरगे फौजदार साहेब यांनी बबन जाधवर पोलिसाचे नाव फिर्यादीमध्ये घेतले नसल्याने ते नाव घ्या असे म्हणाले असता चोरगे साहेबांनी मी पोलीस बबन जाधवरचे नाव घेत नाही म्हणून सांगितले. यामुळे मी त्या जबाबावर सही केली नाही आणि घरी निघून आले. तरी मी पण एका पोलिसाची मुलगी असून माझे आई, वडील, नवरा आणि सासरा हे मयत झालेले असून घरात कोणी कर्ता पुरूष नाही. माझ्यावर वरीलप्रमाणे गणेश काळे आणि बबन जाधवर यांनी बलात्कार केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी. मी दिलेला हा अर्ज तक्रार म्हणून वरील दोघावर कारवाई करावी, अशी विनंती देखील त्या महिलेने केली आहे. 

रक्षकच भक्षक बनत असतील तर सामान्य लोकांनी न्याय कुणाकडे मागायचा हा प्रश्न आता सध्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे.

काय म्हणाले पोलीस अधिकारी?

आमच्या प्रतिनिधीने अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पालवे यांना याविषयी माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सदर घटनेमध्ये पोलिसाचा कसलाही रोल नाहीये. पीडित महिलेला कोणीतरी पोलिसांचं नाव घेण्यास सांगितले होते परंतु महिलेची समजूत काढल्यानंतर त्या महिलेने गुन्हा नोंद करतेवेळी पोलिसाचे नाव घेतले नाही त्यामुळे या या घटनेत पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद होणार नाही.

सदर पोलीस कर्मचारी हा डिटेक्शन टीममध्ये असतो त्या कर्मचाऱ्याला पारधी समाजातील गुन्ह्याची माहिती आहे म्हणून काही लोकांनी महिलेस पोलिसाचे नाव घेण्यास सांगितले होते असंही पोलिसांनी म्हटलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी