धुळे : एटीएम कार्डद्वारे खात्यातून पैसे काढून लुबाडणाऱ्या टोळीचा छडा लावण्यास शिरपूर पोलिसांना यश आले आहे. या टोळीकडून वेगवेगळ्या बँकेचे तब्बल 94 एटीएम कार्डही जप्त करण्यात आले आहे. तर या कारवाईत शिरपूर तालुका पोलिसांनी चार सराईत आरोपींना अटक केली आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेतून पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे.
महिलांना, आणि नागरिकांना हेरून एटीएम सेंटरवर पाळत ठेवून असायचो. कोणाला पैसे काढून हवे असतील तर मदत करण्याच्या बहाण्याने आम्ही पुढाकार घ्यायचो .आणि पिन नंबर विचारून कार्ड अचानक बदलून नंतर खात्यातून पैसे काढून पसार व्हायचो 'अशी धक्कादायक माहिती देऊन या सराईत आरोपीने प्रसारमाध्यमांसमोर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक 3 वर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये काही संशयित इसम मुंबई पासिंगच्या एम. एच. 02 बी झेड 3439 स्विफ्ट डिझायर वाहनामध्ये फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी आपल्या पथकासह साखर कारखान्याजवळ जाऊन या संशयितांना पकडले.
त्यांच्या वाहनांमधील वेगवेगळ्या बँकेचे एकूण 94
एटीएम कार्ड जप्त करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. तर या कारवाईत एकूण चार आरोपीतांना अटक करण्यात आली असून सदरील ते उल्हासनगर, कल्याण ठाणे, येथील रहिवासी असल्याचे उघड झाले आहे.त्यांच्यावर विविध 12 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.....
जप्त केलेला मु्देमाल
तर या आरोपींकडून एकूण 9 हजार रुपये रक्कम , मोबाईल, विविध बँकेचे 94 एटीएम, चार लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली आहे. यावेळी आरोपीने चोरी कश्या पद्धतीने करायचं हे कबूल केले.