जळगाव: 'माझं तिकीट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी मिळून कापलं आहे. माझं राजकारण संपवण्याचा हा डाव आहे.' असं थेट नाव घेत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आरोप केले आहेत. त्यामुळे आता भाजपमधील अंतर्गत वाद हे चव्हाट्यावर आले आहेत. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना खडसेंनी थेट फडणवीस आणि महाजन यांच्यावर आरोप केले आहेत.
'मला तिकीट मिळू नये यासाठी भाजपच्या कोअर कमिटीमध्येच देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. ही माहिती मला कोअर कमिटीमधील इतर सदस्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. त्यामुळे जी येणारी जागा होती ती देखील भाजपने हातची गमावली. याशिवाय जवळपासच्या १० ते १२ जागांचं देखील यावेळी नुकसान झालं.' असं म्हणत एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांच्याविरोधात सरळसरळ नाराजी व्यक्त केली आहे.
'पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी माझी भेट झाली. यावेळी मी रोहिणी खडसे यांच्या पराभवात ज्या-ज्या व्यक्तींनी सहभाग घेतला त्यांच्याविरोधात पुरावे दिले आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. पण त्यांच्यावर जर कारवाई होत नसेल तर मला वेगळा विचार करावा लागेल हे मी वारंवार सांगितलं आहे. त्यादृष्टीने मला जेपी नड्डा आणि चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिलं आहे की, दोषींवर कारवाई करु. पण वारंवार आश्वासन देऊन कारवाई झालेली नाही. दरम्यान, याबाबत पुन्हा एकदा जेपी नड्डा यांच्याशी माझी चर्चा होणार आहे.' असंही खडसे म्हणाले.
'जर भाजपमध्ये माझं राजकीय भवितव्य दिसत नसेल तर मला अन्य पर्याय शोधावे लागतील. कारण जाणीवपूर्वक नाथाभाऊचं राजकारण संपवण्याचा डाव आहे. मला तिकीट देण्यास देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी विरोध केला होता. पण वरिष्ठांनी त्यांना सांगितलं होतं की, नाथा भाऊंना तिकीट दिलं पाहिजे. आम्ही याबाबत विचार करु. पण आता विरोध झाला हे निश्चित आहे. पण त्यानंतर जो काय निर्णय झाला तो आपल्यालाही माहिती आहे.' असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
'जे पक्षाचे जनाधार होते त्यांचं तिकीट कापणं आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांना प्रचारासाठी महाराष्ट्रभर न पाठवता देवेंद्र फडणवीस हेच संपूर्ण राज्यात फिरत होते. त्यामुळे टीम वर्क झालं नाही. त्यामुळे आज भाजपच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला. तसंच भाजपने सत्ता देखील यावेळी गमावली.' असं म्हणत खडसे यांनी सत्ता गमवण्यास थेट देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरलं आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी थेट फडणवीस आणि महाजन यांच्यावर आरोप केल्यामुळे आता पक्ष याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.