Ash powder Export । भुसावळ - दीपनगर केंद्रात वीजनिर्मितीसाठी जाळलेल्या कोळशाची राख भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे अॅश पॉडमध्ये पाठवली जाते. या राखेतील पाण्यावर तरंगणाऱ्या सेनोस्पिअर राखेला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी आहे. रंग, रसायन, जहाज व विमान बांधणी या उद्योगांमध्ये वापरासाठी ही राख वेल्हाळा येथून थेट दुबई, अमेरिका, इंडोनेशियामध्ये निर्यात केली जाते. या सेनोस्पिअर राखेच्या संकलनातून वेल्हाळे परिसरातील तब्बल २०० जणांना चांगल्या रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. (Export of Deepanagar Center Waste Cenospire Ash to Dubai, USA, Indonesia )
भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक केंद्रात वीजनिर्मितीसाठी कोळसा जाळला जातो. जळालेल्या कोळशातून निर्माण होणाऱ्या ६० टक्के राखेत (बॉटम अॅश) पाणी मिसळून त्याची स्लरी तयार केली जाते. ही स्लरी पाइपलाइनद्वारे दीपनगर पासून १४ किलोमीटर अंतरावरील वेल्हाळे अॅश पॉडमध्ये (राखेचा बंड) सोडली जाते. वेल्हाळे पॉडमध्ये ही राख पाण्यात तळाशी बसते. मात्र, या राखेतील अतिसुक्ष्म पाण्यावर तरंगणारे कण, वेल्हाळेतील सुमारे २०० मजुरांनी सेनोस्पिअर राख संकलित करण्यासाठी २० ते २५ जणांचे गट तयार करुन दिवस ठरवले आहेत. एका दिवसात ५०० ते ७०० किलो सेनोस्पिअर राख संकलित होते. स्थानिक ठेकेदारांना विक्री करुन प्रत्येक कुटुंबाला किमान ७०० ते १ हजार रुपये मिळतात, असे मजुरांनी सांगितले.
दीपनगर औष्णिक केंद्रात वीजनिर्मिती नंतरची टाकाऊ राख वेल्हाळे अॅश पॉडमध्ये सोडली जाते. राखेचे अतिसूक्ष्म व वजनाने अत्यंत हलके असलेले कण पाण्यावर तरंगतात. अशा तरंगणाऱ्या कणांना सेनोस्पिअर राख म्हटली जाते. उद्योगांमध्ये या राखेचा वापर वाढत असल्याने मागणी वाढत आहे.