फडणवीस सरकार स्वातंत्र्यानंतरचं सर्वात भ्रष्ट सरकार: अनिल गोटे 

जळगाव
रोहित गोळे
Updated Jan 07, 2020 | 13:29 IST

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले अनिल गोटे यांनी आता थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केली आहे. फडणवीस हे दिलेला शब्द कधीही पाळत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

fadnavis government's most corrupt government after independence anil gote criticized
फडणवीस सरकार स्वातंत्र्यानंतरचं सर्वात भ्रष्ट सरकार: अनिल गोटे   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • स्वातंत्र्यानंतरचं सर्वात भ्रष्ट सरकार कोणतं असेल तर ते फडणवीस सरकार: गोटे
  • फडणवीस दिलेला शब्द कधीही पाळत नाही, अनिल गोटेंचा आरोप
  • शिवस्मारक आणि समृद्धी महामार्गात मोठा घोटाळा केल्याचाही आरोप

धुळे: 'फडणवीस सरकार हे स्वातंत्र्यानंतरचं आजवरचं सर्वात भ्रष्ट सरकार आहे. आजवर असं सरकार मी कधीही पाहिलं नाही. कारण मागील पाच वर्षात या सरकारने महाराष्ट्र अक्षरश: ओरबाडून काढला.' असे थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी केला आहे. २०१४ मध्ये अनिल गोटे हे भाजपच्या तिकीटावरुन विधानसभेत निवडून गेले होते. मात्र, साधारण वर्षभरापूर्वीच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 

अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका करत अनेक आरोप केले. 'फडणवीस दिलेला शब्द कधीही पाळत नाहीत. त्यामुळे लोकांचा आता फडणवीसांवरील विश्वास उडाला आहे. त्यांच्या खोटारडेपणाला कंटाळूनच मी राजीनामा दिला.' असंही अनिल गोटे यावेळी म्हणाले. 

'भाजप आता कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलेला नाही. इथे सगळ्यांना गुंडांना आता स्थान देण्यात आलं आहे. मागील पाच वर्षात सरकारी कामांमध्ये प्रचंड घोटाळे झाले आहेत. एवढंच काय तर शिवस्मारक आणि समृद्धी महामार्ग यामध्ये देखील घोटाळा करण्यात आला आहे.' असा खळबळजनक आरोप गोटेंनी केला आहे. 

याचवेळी अनिल गोटे असंही म्हणाले की, 'राज्यात सत्तेत आलेलं सरकार हे लोकांच्या मनातील सरकार आहे. कारण जर हे मनातील सरकार नसतं तर आतापर्यंत राज्यात उठाव झाला असतं. यावरुन एक गोष्ट स्पष्ट आहे की, लोकांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा विश्वास उडाला आहे.' असं अनिल गोटे म्हणाले. 

धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी अनिल गोटे हे प्रचार सभा घेत आहेत. त्याचवेळी बोलताना त्यांनी भाजपवर घणाघाती आरोप केले. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा नक्कीच वाढतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. 

विधानसभेत अनिल गोटेंचा पराभव:

धुळे शहरातून एमआयएमच्या फारूख शहा यांनी अपक्ष उमेदवार अनिल गोटे यांचा पराभव केला आहे. तर मालेगाव मध्य या मतदार संघातून मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीक आघाडीवर आहे. त्यामुळे ही जागाही विजयी होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाही एमआयएमने दोन जागांवर आपला क्लेम कायम ठेवला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी