नंदुबार : जिल्ह्यात (district) एक लज्जास्पद घटना घडली आहे. येथील एका आदिवासी (tribal) पाड्यावर एका महिलेला डाकिण असल्याच्या संशयावरुन विवस्त्र करुन मारहाण आणि चटके देण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ (Video) व्हायरल झाला आहे. या जिल्ह्यातील आदिवासी लोकांची लोकसंख्या अधिक असून येथे साक्षरता कमी आहे. या भागात डाकिणीविषयी कमालीची भीती व्यक्त केली जाते. या भीतीतूनच या महिलेसोबत हा दुर्दैवी प्रकार झाल्याचा दावा केला जात आहे.दरम्यान, ही घटना नेमक्या कोणत्या पाड्यावर घडली? पीडित महिला कोण? तिचे नाव काय? या घटनेनंतर तिचे काय झाले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु व्हिडिओतील बोलीभाषेवरुन हा प्रकार सातपुडा पर्वतरांगात कुठेतरी घडला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक महिला विवस्त्र अवस्थेत दिसून येत आहे. तिला एका खांबाला बांधण्यात आले आहे. उपस्थित जमाव ती डाकिण असल्याचा आरोप करत आहे. तसेच तिने आतापर्यंत किती जणांना नुकसान पोहोचवले? याचा जाबही विचारत आहे. तर पीडित महिला स्वतःची अब्रु झाकताना दिसून येत आहे. यावेळी तिला चटके देण्याचा संतापजनक प्रकारही व्हिडिओत दिसून येतो. या घटनेचे जवळपास 3 व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
ही घटना घडून आठवडा लोटला तरी पोलिसांना अद्याप घटनास्थळ व आरोपींचा माग काढता आला नाही. "मागील 2-3 दिवसांपासून सोशल मीडियावर महिलेचा विवस्त्र अवस्थेतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओतील लोक तिला स्थानिक बोलीभाषेत काही प्रश्न विचारत आहेत. तिचा डाकिण म्हणून उल्लेख करत आहेत. पोलिस ही घटना कुठे घडली याचा तपास करत आहेत.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. संघटनेने या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अंनिस या प्रकरणी राज्य व केंद्रीय महिला आयोगाचाही दरवाजा ठोठावणार आहे. "समाज एकीकडे स्त्री स्वातंत्र्य व महिला सन्मानाच्या गोष्टी करतो. पण, दुसरीकडे अशा घटनांच्या माध्यमांतून त्यांचा अतोनात छळ करतो. हा अत्यंत निषेधार्ह प्रकार आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे. अंनिसही स्वतःच्या यंत्रणेमार्फत याचा शोध घेईल. पण, राजकीय नेतृत्वानेही या घटनेची गंभीर दखल घेऊन पीडित महिलेला न्याय मिळवून दिला पाहिजे," असे अंनिसचे राज्य सरचिटणीस विनोद सावळे यांनी म्हटले आहे.