Law and Order issue in Maharashtra says Girish Mahajan : जळगाव : महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था उरलेली नाही. राज्याचे माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत. राज्यातील अनेक मंत्री आणि उच्चपदस्थ यांची चौकशी सुरू आहे. पोलीस बदल्यांचा बाजार मांडला आहे. पैसे वसुलीच्या भानगडी उघड होत आहेत. मंत्र्यांच्या जेलच्या वाऱ्या सुरू आहेत. गुंड मोकाट सुटले आहे. मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. राज्यातील सत्ताधाऱ्यांवर सातत्याने गंभीर आरोप होत आहेत. यातील काही आरोपांमध्ये कायदेशीर कारवाई सुरू आहे. एवढी वाईट परिस्थिती महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाली आहे; अशा शब्दात भाजपच्या गिरीश महाजन यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका केली.
खोट बोल पण नेटाने बोल ही म्हण शिवसेनेच्या संजय राऊतांना तंतोतंत लागू पडते, असे गिरीश महाजन म्हणाले. प्रसिद्धीसाठी संजय राऊत मोठ्याने बोलतात. ते वल्गना करतात; असेही गिरीश महाजन म्हणाले.
ईडीने संजय राऊत यांच्याशी संबंधित संपत्तीची जप्ती केली. यानंतर संजय राऊत यांनी त्यांची हत्या होण्याची शक्यता आहे, असे सांगितले. बेकायदेशीपणे एकही रुपया अथवा जमीन सापडली तर मी भाजपला दान करेन, असेही राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी भाजपच्या गिरीश महाजन यांना प्रतिक्रिया विचारली. उत्तरादाखल गिरीश महाजन यांनी संजय राऊत जे बोलताहेत ते कुठे सत्य झालं का? असा प्रश्न पत्रकारांना केला.