धुळे : धुळ्यात लिंबूचे भाव गगनाला भिडले आहेत. यंदा तर लिंबूने मागील सर्व विक्रम मोडून भाव दोनशेच्या पार गेल्याचे बघायला मिळत आहे. लिंबूच्या लागवडीवर वातावरणाचा तसेच अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या परिणामाने गेल्या महिना भरापासून बाजारात लिंबूची आवक कमी झाली आहे.
व्यापाऱ्यांच्या मागणीच्या तुलनेत लिंबूंची आवक कमी होत असून किरकोळ बाजारात एका लिंबूची विक्री दहा रुपयांना केली जात आहे. मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे लिंबू उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे, ज्या ठिकाणी लिंबू उत्पादक शेतकरी 100 गोणी लिंबूचा माल घ्यायचा त्याच ठिकाणी आता चार ते पाच गोणी माल निघत आहे, तसेच इंधन दरवाढ याचादेखील फटका व्यापाऱ्यांना आणि किरकोळ विक्रेत्यांना बसत आहे. त्यामुळेच लिंबूचे भावे दोनशे रुपये पार गेल्याचं धुळ्यातील लिंबूचे किरकोळ विक्रेत्याने सांगितले.
थंडीत मोठ्या प्रमाणावर धुके पडल्याने फळधारणेवर परिणाम झाला. उन्हाळय़ात लिंबूच्या लागवडीस भरपूर पाणी लागते भरपूर पाणी उपलब्ध झाले तर लागवडही चांगली होते. मात्र, तीव्र उन्हाच्या झळांचा फटका लिंबांना बसला.
तसेच मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 500 झाडांच्या बागेत फक्त 4 ते 5 गोणी माल लिंबू निघत आहे. त्यामुळे यंदा लिंबूची विक्रमी वाढ झाल्याचे लिंबूचे व्यापारी शिवदास महाले यांनी सांगितले.