मोठी बातमी! आमदार चंद्रकांत पाटीलही फुटले?

जळगाव
सुनिल देसले
Updated Jun 22, 2022 | 16:16 IST

Maharashtra political crisis: महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असून क्षणाक्षणाला नवनव्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं पहायला मिळत आहे.

Shiv Sena
मोठी बातमी ! आमदार चंद्रकांत पाटीलही फुटले? तातडीने मुंबईला की गुवाहाटीला? वाचा सविस्तर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे यंनी बंड पुकारल्यानंतर ते आपल्या समर्थक आमदारांसह सुरतला पोहोचले. त्यानंतर हे सर्व आमदार आता गुवाहाटीत दाखल झाले आहेत.
  • एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या दोन आमदारांनी घरवापसी करत पुन्हा महाराष्ट्रात दाखल झाले असतानाच शिवसेनेचे फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील हे सुद्धा गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाल्याचं वृत्त समोर आलं

जळगाव : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena leader Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे यांचं बंड शमविण्यासाठी शिवसेनेकडून (Shiv Sena) प्रयत्न सुरू आहेत. तर तिकडे एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत तब्बल ४६ आमदारांचं समर्थन असून लवकरच आपला अंतिम निर्णय जाहीर करण्याचं म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांचं समर्थन असल्याचा दावा केल्याने महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) अडचणीत येताना दिसत आहे. संख्याबळ सिद्ध करण्याची वेळ आली तर ठाकरे सरकार अल्पमतात येईल हे निश्चित आहे. त्यामुळे एक-एक आमदाराची साथ ही मविआसाठी मोलाची आहे. मात्र, आता त्याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यंनी बंड पुकारल्यानंतर ते आपल्या समर्थक आमदारांसह सुरतला पोहोचले. त्यानंतर हे सर्व आमदार आता गुवाहाटीत दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या दोन आमदारांनी घरवापसी करत पुन्हा महाराष्ट्रात दाखल झाले असतानाच शिवसेनेचे फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील हे सुद्धा गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. तर दुसरीकडे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे सुद्धा तातडीने मुक्ताईनगर येथून मुंबईच्या दिशेने निघाले असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे विधान परिषदेची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज पहाटे मुक्ताईनगर येथील घरी आले होते. त्यानंतर ते फोन आल्यामुळे तात्काळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती त्यांच्या पत्नी यामिनी पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्याचे राजकारण सध्या चांगलेच तापले असून एका एका आमदारांच्या मताला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. आज मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार विधान परिषदेचे निवडणूक संपल्यानंतर मुलाची तब्येत बिघडल्यामुळे पहाटे घरी पोचले होते, त्यानंतर त्यांना तात्काळ फोन आल्यामुळे पुन्हा ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

चंद्रकांत पाटील यांना गुलाबराव पाटील यांनी फोन करुन जळगाव विमानतळावर बोलावले. आमदार चंद्रकांत पाटील यांचा चार्टर्ड प्लेनसमोर उभे असलेला एक फोटोही समोर आला आहे. आता अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे मुंबई येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना समर्थन देणार की गुवाहाटीला रवाना होणार हे पहावं लागले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी