जळगाव : शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात अनेकांनी निषेध व्यक्त केला. गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायत प्रचार भरसभेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या (Hema Malini) गालांशी केली होती. त्यामुळे, गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील होऊ लागली होती. या सर्व पार्श्वभूमीवर अखेर मंत्री गुलाबराव पाटील यांनी माफी मागितली आहे, त्यामुळे हा वाद इथेच मिटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, माफी मागताना गुलाबराव पाटील यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचं म्हटलं आहे. भाषणातील माझ्या वक्तव्यामुळं कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर, मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायत (Bodvad Nagar Panchayat) निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत भाषण करताना आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनींच्या गालासारखे केल्याचं त्यांनी म्हटलं होत. इतकंच नाही तर हेमा मालिनीच्या गालासारखे (Hema Malini) रस्ते दिसले नाहीत तर राजीनामा देईन असंही त्यांनी म्हटलं आहे. "गेली ३० वर्षे एकनाथ खडसे या भागातील आमदार आहेत. पण ते चांगले रस्ते करु शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा, हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते मी केले आहेत", असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं.
आपल्या मतदारंघातील रस्त्याची तुलना त्यांनी एका महिला खासदाराच्या गालासोबत केली, या विधानाबाबत जाहीर माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. त्याचबरोबर, एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून गुलाबराव पाटील यांनी केलेले विधान करणे हे निषेधार्ह आहे. असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. तसंच, एका वस्तूची तुलना महिलेच्या रंग रुपासोबत करणे, ही संस्कार आणि संस्कृती अत्यंत नीचपातळीची आहे. आपण महिलांना दुय्यम वागणूक देतात, हे चुकीचं आहे. असं देखील चाकणकर यांनी म्हटलं आहे. गुलाबराव पाटील यांनी 'आपल्या मतदारसंघातील रस्ते हे हेमामालनीच्या गालासारखे आहे' असं विधान करून वाद ओढावून घेतला आहे.