कडबा कुट्टीसह भरलेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, शेतकऱ्याचा चिरडून मृत्यू

जळगाव
भरत जाधव
Updated Apr 15, 2023 | 15:23 IST

जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सामरोद शिवारात एक दुर्दैवी घटना घडली. गोठ्यातील गुरांसाठी शेतातून कडबाकुट्टी आणत असताना ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने शेतकरी ट्रॅक्टरसह बांधालगत असलेल्या विहिरीत कोसळला.

Tractor loaded with kadaba kutti falls into well, death of farmer
ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, शेतकऱ्याचा मृत्यू   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शेतकरी ट्रॅक्टरसह बांधालगत असलेल्या विहिरीत कोसळला.
  • सुपडू देसाई यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले.
  • ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत अंगावर पडल्याने, त्याखाली दबून सुपडू देसाई यांचा मृत्यू

जळगाव :  जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सामरोद शिवारात एक दुर्दैवी घटना घडली. गोठ्यातील गुरांसाठी शेतातून कडबाकुट्टी आणत असताना ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने शेतकरी ट्रॅक्टरसह बांधालगत असलेल्या विहिरीत कोसळला. ट्रॅक्टर अंगावर पडल्याने त्याखाली दबून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत सुपडू सुकदेव देसाई (वय 65 वर्ष, रा. सामरोद ता. जामनेर) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. (Tractor loaded with kadaba kutti falls into well, death of farmer)

अधिक वाचा  : निवडणूक आयोगानं ऐकली राष्ट्रवादी काँग्रेसची ही विनंती

सामरोद येथील रहिवासी सुपडू देसाई हे गोठ्यातील गुरांना कडबा कुट्टी आणण्यासाठी ते शुक्रवारी दुपारी ट्रॅक्टर घेऊन शेतात गेले होते. या ठिकाणी त्यांनी शेतातून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये कडबा कुट्टी भरली. त्यानंतर ते कडबाकुट्टी भरलेला ट्रॅक्टर घेऊन घराकडे असलेल्या गोठ्याकडे निघाले, मात्र काही अंतरावर चालक सुपडू देसाई यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले.  नियंत्रण सुटल्याने  कडबा कुट्टीने भरलेले ट्रॅक्टर देसाई यांच्या शेताच्या बांधालगत असलेल्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत कोसळले. ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत अंगावर पडल्याने, त्याखाली दबून सुपडू देसाई यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सामरोद गावाचे सरपंच श्रीकांत पाटील व ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने आधी ट्रॅक्टर ट्रॉली काढण्यात आले. त्यानंतर सुपडू देसाई यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.  घटनेची माहिती मिळाल्यावर जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी