बापरे ! थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी शेतकऱ्यांच्या चोरल्या तब्बल इतक्या मेंढ्या?

20 sheep stolen in Kolhapur : गुरुवारी सकाळी नऊ वाजता मेंढ्या मोजल्या असता त्यातील २० मेंढ्या अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे लक्षात आले. या मेंढ्या पांढऱ्या आणि तांबूस रंगाच्या असून अंदाजे दोन ते तीन वर्षाच्या आहेत

20 sheep stolen in Kolhapur
थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी शेतकऱ्यांच्या चोरल्या मेंढ्या?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जमिनीचा कस वाढवण्यासाठी मेंढी खतांसाठी बकरी अथवा मेंढ्या शेतात बसवल्या जातात
  • दारात बांधलेल्या अंगणात बांधलेल्या दोन शेळ्या देखील गेल्या चोरीस
  • ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मेंढ्या चोरी झाल्याची शक्यता?

20 sheeps stolen : कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कदायक घटना घडली आहे. एका कळपातून १ – २ नव्हे तर तब्बल २० मेंढ्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. थर्टी फस्ट आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मेंढ्यांची चोरी झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. सदर ,मेंढ्या या एका शेतकऱ्याच्या शेतात खतासाठी बसवण्यात आल्या होत्या. चोरी करण्यात आलेल्या २० मेंढ्यांची किंमत तब्बल एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. या मेंढ्या कोणी चोरून नेल्या याचा पोलीस शोध घेत आहेत.

जमिनीचा कस वाढवण्यासाठी 

शेतामध्ये उसाची लावण करण्यापूर्वी जमिनीचा कस वाढवण्यासाठी मेंढी खतांसाठी बकरी अथवा मेंढ्या शेतात बसवल्या जातात. हा मेंढ्याचा कळप हा एका शेतकऱ्याच्या शेतात एकाच शेतात तीन ते चार दिवस बसवला जातो. कारण मेढ्यांच्या विष्ठेपासून उत्तम खतनिर्मिती होते, हे खत शेतीसाठी खूप पोषक असतो असं मानले जाते. त्यामुळे, शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील शेतकरी संजय सुरेश पाटील यांच्या मालकीच्या शेतात मेंढ्या खतासाठी बसवलेल्या होत्या. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पाटील यांच्या शेतात युवराज महादेव येडके, सुरेश आण्णासो हाके आणि विनोद यंकापगोळ यांच्या मेंढ्या बसवण्यात आल्या होत्या. गुरुवारी सकाळी नऊ वाजता मेंढ्या मोजल्या असता त्यातील २० मेंढ्या अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे लक्षात आले. या मेंढ्या पांढऱ्या आणि तांबूस रंगाच्या असून अंदाजे दोन ते तीन वर्षाच्या आहेत. मेंढ्यांच्या उजव्या व डाव्या कानावर उभे आणि आडवे काप आहेत.

दोन शेळ्या देखील गेल्या चोरीस

येडके यांच्या मालकीच्या सात, हाके यांच्या मालकीच्या तीन तर यंकापगोळ यांच्या मालकीच्या दहा मेंढ्या चोरीस गेल्या आहेत. मेंढ्या चोरीला गेल्याचे लक्षात येताच मेंढ्याचे मालक युवराज येडके यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी देखील सदर घटनेची तत्काळ दखल घेत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर शिरोळ गावात देखील अश्याच पद्धतीने एक चोरी झाल्याचे उघड झाले आहे. गारडी गल्लीत दारात बांधलेल्या अंगणात बांधलेल्या दोन शेळ्या चोरीस गेल्याची फिर्याद विकी सकट यांनी शिरोळ पोलिस ठाण्यात दिली आहे. 

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर चोरी ?

दरम्यान, ३१ डिसेंबर रोजी नव्या वर्षाचे स्वागत करताना अनेकजण मटणाची मागणी करतात. त्यामुळे मटणाची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत असते. खवय्ये आणि हॉटेल चालकांकडून बकऱ्याच्या मटणाची मोठी मागणी असते. सध्या बाजारात मेंढ्या, बकरी, पालव्यांची चणचण भासत आहे. ज्या प्रमाणात मटणाची मागणी होते त्या प्रमाणात हॉटेल मालक मटण पुरवू शकत नाहीत. दरम्यान, चोरट्यांनी याच कारणांसाठी या मेंढ्या चोरल्या असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी