6G Technology: 40 वी जिस्फी (GISFI) व आंतरराष्ट्रीय परिषद कोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली. कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे महाविद्यालय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे (ऑटोनॉमस) आयोजित जिस्फी (GISFI)बैठक व 6G आणि वायरलेस नेटवर्क टेक्नॉलॉजीची आंतरराष्ट्रीय परिषद NAAC चे चेअरमन प्रा. अनिल सहस्त्रबुद्धे आणि प्रमुख पाहुणे अरहास युनिव्हर्सिटी डेन्मार्कचे जिस्फीचे चेअरमन रामजी प्रसाद यांच्या उपस्थितीत सयाजी हॉटेलमध्ये 3 व 4 एप्रिल रोजी संपन्न झाली. जिस्फी बैठकींतर्गत देश व विदेशातील 6G तंत्रज्ञान व त्या संदर्भात सुरू असलेले संशोधन याविषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट 'आत्मनिर्भर भारतबाबत काम करण्यासाठी सज्ज राहा, असं प्रा. रामजी प्रसाद यांनी उपस्थितांना संबोधित केलं. तसेच प्रा. प्रसाद यांनी उपस्थितांना नवसंशोधक व विद्यार्थ्यांना 6G तंत्रज्ञान व वायरलेस कमुनिकेशन यावरील संशोधनासाठी प्रेरित केलं. प्रा. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना नवीन शैक्षणिक धोरण व गुणवत्ता पूर्वक शिक्षण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोच करता येईल, यावर उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं.
AICTE,भारत सरकार व देशातील नामांकित शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातून चालू असलेल्या स्वयम या शैक्षणिक कार्यक्रमाबाबत विद्यार्थ्यांना जागरूक केले. तसेच 6G व नवीन तंत्रज्ञान याचा शिक्षणात जास्तीत जास्त कसा उपयोग करता येईल, यावर मत मांडले. या परिषदेसाठी बालमुरलीधर प्रसाद (Chief scientist robotics TCS BANGALORE) व अर्पण पाल (chief scientist embedded devices TCS BANGALORE) यांची देखील उपस्थिती लाभली.
आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत 42 नवसंशोधकांचे संशोधन पेपर सादर करण्यात आले. त्याच्यातील निवडक पेपर आंतरराष्ट्रीय परिषदेंतर्गत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तसेच 5 एप्रिल रोजी 'स्टार्टअप इकोसिस्टिम इंडिया अँड ग्लोब' अंतर्गत स्टार्टअप वर 6 वेगवेगळ्या पाहुण्यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी जगभरातून नवसंशोधक, अध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. 100 संशोधन पेपर मधून 42 निवडक पेपर परिषदेत सादर करण्यात आले. परिषदेला मोठ्या संख्येने संशोधकांनी सहभाग नोंदवला.
या परिषदेच्या आयोजनासाठी केआयटीचे चेअरमन सुनील कुलकर्णी, व्हाईस चेअरमन साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, विश्वस्त भरत पाटील व प्रतापसिंह रावराणे, कार्यकारी संचालक डॉ. विलास कर्जीनी, संचालक मोहन वनरोट्टी यांचे मार्गदर्शन मिळाले. परिषदेचे प्रमुख आयोजक डॉ. महेश चव्हाण व समन्वयक म्हणून डॉ. नितीन सांबरे यांनी परिश्रम घेतले.