[VIDEO] Kolhapur-Sangli Flood: काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईतून रवाना

कोल्हापूर
Updated Aug 14, 2019 | 13:17 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Kolhapur-Sangli Flood: काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही पुढाकार घेतला आहे. आज, त्या मदत पथकासह सांगली, कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी पूरग्रस्त भागात त्या मदतकार्य करणार आहेत.

congress leader urmila matondkar relief work
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उर्मिला सांगली-कोल्हापूरला रवाना   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • पुणे-बेंगळुरू महामार्ग खुल झाल्यामुळे कोल्हापूर पूरग्रस्तांनासाठी बाहेरून मदतीचा ओघ
  • सांगलीकडे जाणारे रस्तेही खुले झाले; सरकार स्वयंसेवी संस्थांची पथके मदतकार्यासाठी रवाना
  • काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर सांगली, कोल्हापूरसाठी रवाना; पूरग्रस्तांना देणार मदत

मुंबई: कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूर ओसरत आहे. कोल्हापूरजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर पाणी आल्याने शहराची रसद तुटली होती. दोन दिवसांपूर्वी महामार्गावरील पाणी ओसरल्यामुळे आता कोल्हापुरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू झाला आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर ठिकाणांहून वैद्यकीय पथके आणि पूरग्रस्तांसाठी मदत येऊ लागली आहे. पूरग्रस्त भागातील स्वच्छतेच्या कामासाठी मुंबई, पुण्यातून स्वयंसेवक येत आहेत. यात काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही पुढाकार घेतला आहे. आज, त्या मदत पथकासह सांगली, कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी इतरांनाही पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केले आहे. मदतीसाठी आवाहन करणारा त्यांचा एक व्हिडिओही व्हॉट्सअपवर शेअर होत आहे.  

 

 

‘स्वातंत्र्यदिनी कर्तव्य पार पाडा’

उर्मिला मातोंडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करताना, यंदाचा स्वातंत्र्यदिन हा कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना समर्पित करण्याचे आवाहन केले आहे. केवळ मदतीसाठी किंवा सुटकेसाठी प्रार्थना करण्यापेक्षा पूरग्रस्तांना मदतीचा थेट हात द्या, असे उर्मिला यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्यासोबत कर्तव्य येते आणि हे कर्तव्य पार पाडण्याची वेळ आज आपल्यावर आली आहे. उद्याचा स्वातंत्र्यदिन आपण कोल्हापूर, सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी समर्पित करून आपले कर्तव्य पार पाडू, असे उर्मिला यांनी म्हटले आहे. उर्मिला यांच्या मदतीच्या ताफ्यात पूरग्रस्तांसाठीचे जीवनावश्यक साहित्य असून, वैद्यकीय मदतीसाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. उर्मिला मातोंडकर या काँग्रेसच्या नेत्या असून, त्यांनी मे महिन्यात मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. निवडणुकीत भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

 

 

कोल्हापुरात शिरोळमध्ये अजूनही पूरस्थिती

प्रलयकारी महापुरात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं. पुराचं पाणी ओसरत असलं तरी अजूनही अनेक गावं पुराच्या विळख्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा, पंचगंगेच्या काठावरील शिरोळ तालुक्यातील काही गावांना अजूनही पुराचा विळखा आहे. काही ठिकाणी पुराचे पाणी ओसरले असले तरी, त्या गावांमध्ये जाण्यासारखी परिस्थिती नाही. पुराच्या पाण्यात वाहून आलेला चिखल, कचरा, मृत जनावरे यांमुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. शिरोळ तालुक्यात अजूनही १६ गावांना पुराचा वेढा आहे. त्या गावांमधील काही नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. तर, काहीजण तेथेच पुरात अडकले आहेत. त्यांच्यापर्यंत अन्नाची पाकिटे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्याचे काम सुरू आहे. तालुक्यात पूरग्रस्तांसाठी १०७ निवाराकेंद्रे उभारण्यात आली आहेत. त्या ठिकाणी जवळपास ४० हजार पूरग्रस्त आहेत. पुराने वेढलेल्या गावांना गेल्या काही दिवसांपासून हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून अन्नाचा पुरवठा करण्यात येत होता. काही गावांमधील पूरग्रस्तांना बाहेर काढणे शक्य नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाने हवाई दलाच्या मदतीने त्यांच्यापर्यंत अन्न आणि जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा केला. जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्तांसाठीच्या २५ कोटींपैकी १४ कोटी केवळ शिरोळ तालुक्यासाठी दिले आहेत. ही मदत शिरोळमध्ये पोहोचल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
[VIDEO] Kolhapur-Sangli Flood: काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईतून रवाना Description: Kolhapur-Sangli Flood: काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही पुढाकार घेतला आहे. आज, त्या मदत पथकासह सांगली, कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी पूरग्रस्त भागात त्या मदतकार्य करणार आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...