कोरोनाचा कहर: महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये आजपासून कडक लॉकडाऊन

गेल्या २४ तासात देशातील आकडेवारी थोडीफार कमी जरी वाटत असली तरी कोरोनाचं रौद्र रुप अजून जैसे च्या स्थितीत आहे. विशेषत राज्यात कोरोनाने मोठं थैमान घातले.

Strict lockdown in four districts of Maharashtra
महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये आजपासून कडक लॉकडाऊन   |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • नाशिकमधील कोरोना रुग्णांची संख्या घटली
  • चार जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण कमी होत नसल्याने होणार लॉकडाऊन
  • कोल्हापूर जिल्ह्यात १० दिवसांचा लॉकडाऊन

मुंबई : गेल्या २४ तासात देशातील आकडेवारी थोडीफार कमी जरी वाटत असली तरी कोरोनाचं रौद्र रुप अजून जैसे च्या स्थितीत आहे. विशेषत राज्यात कोरोनाने मोठं थैमान घातले असून राज्यात कोरोनाने  मृत पावणाऱ्यांचा आकडा इतर राज्यांपेक्षा मोठा आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे.

राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून यात सांगली, सातारा, बारामती आणि अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात किराणा, फळे, भाजीपाला, बेकरी, डेयरी, मिठाई आणि खाद्यपदार्थांची दुकानेही येत्या 7 दिवसांसाठी बंद राहणार आहेत. हा लॉकडाऊन आज (मंगळवार) सकाळी सात वाजेपासून सुरु होणार असून १० मे च्या रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार आहे. (Corona: Strict lockdown in four districts of Maharashtra from today )

सांगलीत एका आठवड्यासाठी लॉकडाऊन 

गेल्या २४ तासांत सांगली जिल्ह्यात १ हजार ५६८ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले असून यामध्ये ४० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्याचे जलसंसाधन मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी एका आठवड्यासाठी लॉकडाऊन घोषीत केला आहे. या संदर्भात त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन एक व्हिडियो शेअर केला आहे.

कोल्हापूर जिल्हा

जिल्ह्यात वाढती रूग्णसंख्या पाहता उद्यापासून पुढील १० दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय आज सकाळी १० वा. झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठकीत सहभागी झाले होते. जिल्ह्याचा कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यात उद्या बुधवार दि. ५ मे सकाळी ११ पासून जिल्ह्यात पुढील १० दिवसांसाठी कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. जिल्ह्यात २४०० रूग्ण ऑक्सिजनवर आहेत असून यासाठी कोल्हापूर सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.

सातारा जिल्ह्यात ७ दिवसांचा लॉकडाऊन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर प्रशासन कठोर पावले टाकत असून आता सातारा जिल्ह्यातही उद्या सकाळी सात वाजल्यापासून पुढचे सात दिवस कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी ब्रेक द चेन अंतर्गत याबाबतचा आदेश जारी केला आहे. 
या आदेशानुसार, जिल्ह्यात उद्या (४ मे) सकाळी सात वाजल्यापासून ते १० मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे.

सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह), पाळीव प्राण्यांच्या खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पुर्णपणे बंद राहतील. या दुकानांची घरपोच सेवा सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील.

बारामती जिल्हा

बारामती जिल्ह्यातही पुढील सात दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी होत नसल्याने प्रशासनाने शेवटी आज लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज रात्री १२ वाजल्यापासून पुढील सात दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे. यामध्ये औषधे आणि दुध विक्रीची दुकाने सुरू राहणार आहेत. दुधविक्रीला केवळ ७ ते ९ यावेळेत परवानगी देण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत निर्णय घेण्यात आला. 

काय आहे इतर जिल्ह्यांची स्थिती 

नागपुरमध्ये आढळले डबल म्यूटंट व्हायरस

राज्याची उपराजधानी नागपुर शहरात कोरोना व्हायरसचे डबल म्यूटंट आढळले आहे. दरम्यान, दिल्लीहून मिळलेल्या अवहालानुसार, ७४ सॅम्पलमधील ३५ सॅम्पलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 5 नवे स्ट्रेन आढळल्याचे समोर आले आहेत. तर इतर २६ सॅम्पलमध्ये डबल म्यूटेशन असल्याचे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील मायक्रो बायोलॉजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रवींद्र खडसे यांनी सांगितले. विशेष म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप या स्ट्रेनचे नवीन लक्षण आहेत. हे सॅम्पल नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये आलेल्या संशयित रुग्णांचे असून एनआयव्ही पुणे आणि एनसीडीसी दिल्ली येथे तपासणी करीता पाठवण्यात आले होते.

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्ह्यात १० दिवसांपूर्वी ४८ हजार ५०० रुग्णांवर उपचार सुरु होते. मात्र, गेल्या दहा दिवसांत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा मोठा वाढला असून साडेबारा हजारांनी रुग्णसंख्या घटली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३६ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्यादेखील कमी झाली आहे. नाशिक ग्रामीण २ हजार ७८९, चांदवड १ हजार २०, सिन्नर २ हजार १२५, दिंडोरी १ हजार ८०, निफाड २ हजार ३८५, देवळा १ हजार १५, नांदगांव ५४९, येवला ६६६, त्र्यंबकेश्वर २७८, सुरगाणा ४४६, पेठ १४७, कळवण ६६६, बागलाण १ हजार ३४७, इगतपुरी ४०२, मालेगांव ग्रामीण ८०६ असे एकूण १५ हजार ७२१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहेत.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १८ हजार ४१८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६१७ तर जिल्ह्याबाहेरील २५५ असे एकूण ३६ हजार ०११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८५.४६ टक्के, नाशिक शहरात ८९.९० टक्के, मालेगाव मध्ये ८३.८७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.३० टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८८.१३ इतके आहे. शहरात आतापर्यंत ३ हजार ६०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक ग्रामीण १ हजार ६८१ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ५६९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २५२ व जिल्हा बाहेरील ९८ रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद 

औरंगाबाद जिल्ह्यातील करोना बळींची संख्या २,६०९ वर. आज घाटी रुग्णालयात ३० जणांचा मृत्यू


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी