कोल्हापूर - "तज्ज्ञ डॉक्टर मंडळींमध्ये आलो की आपण केवळ नावापुरते डॉक्टर असल्याची खंत वाटते", अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय अभिनेते डॉ गिरीश ओक यांनी.
मुंबई ऑन्कोकेअर या कर्करोगांवर अद्ययावत उपचार करणाऱ्या डे-केअर साखळीस्वरुप संस्थेच्या कोल्हापुर शाखेचा उद्घाटन सोहळा डॉ. ओक यांच्या हस्ते पार पडला. सायन हॉस्पिटलच्या मेडिसीन विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. नितीन कर्णिक, मुंबई ऑन्कोकेअरचे संचालक डॉ. आशिष जोशी, डॉ. वशिष्ठ मणियार, डॉ. प्रितम कळसकर आणि डॉ. क्षितीज जोशी आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. ओक म्हणाले, "मुळातच कोल्हापूर ही खवैयेनगरी आहे. त्यातच कोल्हापूरची दिलदार मित्रमंडळी आणि कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा दोघेही एकदम रसरशित. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमापुरते कोल्हापुरात यावे आणि लगेच जावे लागले तर रुखरुख लागते. फिटनेस आणि उत्तम व्यायाम यासाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे मात्र अचानक उद्भवलेल्या आजारांवर उपचारासाठी रुग्णांना मुंबई ऑन्कोकेअर या कर्करोगांवर जागतिक दर्जाचे उपचार वाजवी दरात उपलब्ध करुन देणाऱ्या तसेच अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या संस्थेचं कोल्हापुरात आगमन झालयं याचा अतिशय आनंद होत आहे”.
डॉ.अक्षय शिवछंद यांनी कोल्हापुरातील कर्करोगग्रस्तांना उच्चशिक्षित कर्करोगतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, सुरक्षित वातावरणात, वाजवी दरात उपचार उपलब्ध होतील असे आश्वसन दिले. मुंबई ॲान्कोकेअरचे कॅन्सर डे-केअर ही एक वेगळी संकल्पना आहे. ९०% केमोथेरपी या रुग्णांना डे-केअर तत्वावर देता येतात आणि त्याकरीता रुग्णांना २४ तास हॉस्पिटल ॲडमिशनची आवश्यकता नसते. त्यामुळे रुग्णांचा 'ट्रीटमेंट कंप्लायंस' वाढतो. वेळेच्या आणि खर्चाच्या दृष्टिने कर्करोगग्रस्तांसाठी ही फारच दिलासादायक बाब आहे असंही डॉ. अक्षय शिवछंद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.