किरीट सोमय्यांच्या 'आरोप एक्स्प्रेस'ला कराडमध्ये ब्रेक; कोल्हापूरला जाण्यास पोलिसांचा मज्जाव

किरीट सोमय्या सध्या शासकीय विश्रामगृहावर आहेत. सकाळी 10 वाजता सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहेत. ही पत्रकार परिषद आटोपून सोमय्या मुंबईसाठी रवाना होणार आहेत.

Kirit Somaiya was stopped at Karad
किरीट सोमय्यांच्या 'आरोप एक्स्प्रेस'ला कराडमध्ये ब्रेक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.
  • ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे येथे भाजप कार्यकर्त्यांनी सोमय्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
  • पत्रकार परिषदेनंतर सोमय्या मुंबईकडे निघणार

सातारा : भाजपनेते किरिट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यासंबधी आज ते कोल्हापूर दौऱ्यावर निघाले होते. परंतु कोल्हापूरच्या हद्दीत पोहचण्याआधीच सोमय्या यांना पोलिसांनी कराड येथे रोखले आहे. त्यामुळे या घडामोडींना नाट्यमय वळण मिळाले आहे. किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसने सोमय्या मुंबईवरुन कोल्हापूरकडे जात होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्याच्या अधिक माहितीसाठी सोमय्या कोल्हापूरकडे जात होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली आहे.  

दरम्यान, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतील सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांनी सोमय्या यांना कोल्हापूरकडे जाण्यास मज्जाव केला. तरी त्यांनी आपला दौरा सुरू केला. ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे येथे भाजप कार्यकर्त्यांनी सोमय्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार पहाटे पावणे पाच वाजता माजी खासदार किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेस मधून कराड येथे उतरले आहेत. प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. 

किरीट सोमय्या सध्या शासकीय विश्रामगृहावर आहेत. सकाळी 10 वाजता सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहेत. ही पत्रकार परिषद आटोपून सोमय्या मुंबईसाठी रवाना होणार आहेत. दरम्यान, कोल्हापूरचे अतिरीक्त जिल्हा अधिक्षक तिरुपती काकडेंनी सोमय्यांना जिल्हाबंदीचा आदेश दाखवून कोल्हापूरला न जाण्याची विनंती केली. तिरुपती काकडे हे स्वत: कराडमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस चढले. त्यांनी सोमय्यांची चर्चा केली. मात्र कोल्हापूरच्या पूर्वी दोन स्थानकावर उतरण्याची विनंती पोलिसांनी सोमय्यांना केली. 

हसन मुश्रीफांवरील आरोपानंतर कोल्हापूरकडे रवाना

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे या आरोपांचे पुरावे गोळा करण्यासाठी आपण मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कारखान्यावर जाणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. त्यावर मुश्रीफ यांचे समर्थक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या कोल्हापुरात आले तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. या सर्व घडामोडी पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना नोटीस पाठवली. त्यांनी सोमय्या यांना कोल्हापुरात दाखल होऊ नये, असा आदेश दिला.

रेल्वे स्थानकांवर भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी 

महालक्ष्मी एक्सप्रेस लोणावळा रेल्वे स्थानकावर पोहोचली तेव्हा तिथे भाजप कार्यकर्तेही तिथे दाखल झाले होते. त्यांनी घोषणाबाजी करत सोमय्या यांचं समर्थन केले. तसेच काही जणांनी सोमय्या यांचा सत्कार केला. यावेळी सोमय्या यांनी आपण कोल्हापुरात जाणारच, असं कार्यकर्त्यांना ठामपणे सांगितले 
महालक्ष्मी एक्सप्रेस रात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर दाखल झाली. यावेळी देखील पुणे रेल्वे स्थानकावर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली बघायला मिळाली. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी किरीट सोमय्या यांचं अभिनंदन केले. तसेच जोरात घोषणाबाजी देखील केली.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी