Kolhapur Flood: पावसाची मोठी उघडीप; पुराचे पाणी ओसरताना, जनजीवन हळू हळू पूर्वपदावर

कोल्हापूर
Updated Aug 13, 2019 | 13:41 IST | रविराज गायकवाड

Kolhapur Flood: पूरग्रस्त कोल्हापुरातील जनजीवन हळू हळू पूर्वपदावर येत आहे. आज, सकाळपासून बँका आणि इतर व्यवहार सुरू झाले आहेत. पूरग्रस्त भागातील स्वच्छतेचे मोठे आव्हान असून, महापालिकेची यंत्रणा काम करत आहे.

Kolhapur Rain flood impact photo
महापुराने कोल्हापुरात जामदार क्लब परिसरात घरांची झालेली पडझड  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • कोल्हापूर शहर परिसरातील जनजीवन हळू हळू पूर्वपदावर; शिरोळमधील पूरस्थिती कायम
  • कोल्हापुरात पिण्याचा पाण्याचीच सर्वांत मोठी अडचण; पालिकेकडून स्वच्छता मोहीम सुरू
  • शहराचा अजूनही काही तालुक्यांशी संपर्क तुटलेलाच

कोल्हापूर : प्रलयकारी महापुराचा तडाखा बसलेल्या कोल्हापुरातील जनजीवन हळू हळू पूर्वपदावर येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरात पावसाचने चांगली उघडीप दिली आहे. तसेच राधानगरी धरणातून होणारा विसर्गही जवळपास बंद झाल्याने आता पंचगंगेच्या पुराचे पाणी ओसरले आहे. शहरात कालपासून (सोमवार, १२ ऑगस्ट) जीवनावश्यक वस्तूंची आवक सुरू झाली. तसेच पेट्रोल-डिझेलही उपलब्ध झाल्यामुळे जनजीवन हळू हळू पूर्वपदावर येत आहे. आज सकाळपासून बँका आणि इतर व्यवहार सुरू झाले आहेत. शहर परिसरात काही बँकांनाही पुराच्या पाण्याचा फटका बसला होता. पण, आजपासून त्यांचे कामकाज पुन्हा सुरू झाले आहे. शहरात सध्या पूरग्रस्त भागातील स्वच्छतेचे मोठे आव्हान असून, महापालिकेची यंत्रणा त्यासाठी कार्यरत झाली आहे. काल, व्हिनस कॉर्नर परिसरची स्वच्छता करण्यात आली होती. आजही, नागरी वस्त्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. शहरातील नदी लगतच्या शुक्रवार पेठ, बुधवार पेठेत अनेक ठिकाणी पाणी आहे. जामदार क्लबजवळ अजूनही पाणी असून, महापालिकेकडून युद्धपातळीवर औषध फवारणीचे काम सुरू आहे. पुराचा फटका बसलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाची काल स्वच्छता झाली असून, तेथील वीज पुरवठाही सुरळीत करण्यात आला आहे. पुराचा फटका बसल्याने गेले आठ दिवस आपत्ती व्यवस्थापनाचे काम जिल्हा परिषदेच्या कार्यालयातून सुरू होते.

जनावरांची मोठी हानी

शहरातील सखल भागातील नागरी वस्त्या तसेच पंचगंगा नदी पलिकडील आंबेवाडी, प्रयाग चिखली परिसरातील पूरग्रस्त तात्पुरते स्थलांतरीत करण्यात आले आहेत. चिखली परिसरातील पाणी अद्याप पूर्ण ओसरलेले नाही. तसेच कोल्हापूर पन्हाळा (रत्नागिरी) मार्ग अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे चिखली, आंबेवाडी परिसरातील पूरग्रस्त अजूनही कोल्हापुरातच आहेत. शाळा, मंगल कार्यालयांमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था आहे. पूरस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच त्यांची गावाकडे रवानगी करण्यात येणार आहे. दोन्ही गावातील काही नागरिकांचे कोल्हापुरात स्थलांतर झाले असले तरी, जनावरांना वाचवण्यात गावकऱ्यांना अपयश आले आहे. विशेषतः चिखली गावातील जनावरांची मोठी जीवितहानी झाली आहे. अनेक दुभती जनावरे महापुरात वाहून गेली आहेत.

शिरोळमध्ये पूरस्थिती कायम

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत कमी पाऊस पडणार तालुका म्हणून शिरोळचा उल्लेख केला जातो. पण, त्याच तालुक्याला पुराचा सर्वाधिक फटका बसतो. शिरोळ तालुक्यात अजूनही अनेक गावांना पुराचा वेढा आहे. कृष्णा आणि पंचगंगेचा संगम असल्यामुळे तेथील पूरस्थिती महायभयंकर आहे. सध्या तेथील बचावकार्य थांबवले असले तरी, पुरात अडकलेल्यांपर्यंत अन्न व इतर जीवनावश्यक वस्तू पोहचवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सध्या हवाई दलाकडून तेथे हेलिकॉप्टरच्या साह्याने मदतकार्य सुरू आहे.

धान्याचा तुटवडा नाही

महापुराचा फटका कोल्हापूर शहरातील धान्य व्यापारपेठेलाही बसला होता. परंतु, व्यापाऱ्यांनी प्रसंगावधान राखत लक्ष्मीपुरीतील धान्य सुरक्षित स्थळी हालविले होते. त्यामुळे शहर परिसरात धान्य इतर जीवनावश्यक साहित्याचा तुटवडा जाणवला नाही. ज्यांची दुकाने किंवा गोदामे तळ मजल्यावर होती त्यांनी वेळीच आपला माल तेथून हालविला होता. तसेच मार्केट यार्ड परिसरातील गोदामे सुरक्षित होती. त्यामुळे कोल्हापूरची धान्य बाजारपेठ सुरक्षित राहिली. पण, महामार्ग बंद असल्याने आणि शहराला पुराचा वेढा असल्यामुळे गेले आठ दिवस ग्रामीण भागाशी संपर्क तुटलेला आहे. परिणामी तेथे कोणत्याही प्रकारचा पुरवठा होऊ शकलेला नाही. आता पावसाची उघडीप मिळाल्याने हळू हळू रस्ते खुले होत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत ग्रामीण भागात धान्य आणि इतर साहित्याचा पुरवठा सुरू होणार आहे. दरम्यान, पुराचा फायदा घेऊन धान्याच्या किंवा इतर मालाच्या दरात वाढ करू नका, असे आवाहन लक्ष्मीपुरी ग्रेन मर्चंट असोसिएशनन केल्याची माहिती धान्या व्यापारी भरत घोडके यांनी दिली. माल कमी असल्यास ऑर्डर देऊन पटकन मागवून घेण्याचे आवाहन असोसिएशनने केले आहे.

रस्त्यांची काय स्थिती?

  1. पुणे-बेंगळुरू महामार्ग दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी खुला
  2. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग अजूनही वाहतुकीसाठी बंद
  3. कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर अजूनही पाणी
  4. कोल्हापूर-राधानगरी महामार्गही वाहुतकीसाठी बंद
  5. कोल्हापूर-कागल वाहतूक सुरळीत

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
Kolhapur Flood: पावसाची मोठी उघडीप; पुराचे पाणी ओसरताना, जनजीवन हळू हळू पूर्वपदावर Description: Kolhapur Flood: पूरग्रस्त कोल्हापुरातील जनजीवन हळू हळू पूर्वपदावर येत आहे. आज, सकाळपासून बँका आणि इतर व्यवहार सुरू झाले आहेत. पूरग्रस्त भागातील स्वच्छतेचे मोठे आव्हान असून, महापालिकेची यंत्रणा काम करत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...