कोल्हापूर: स्टार्टअप कंपन्यांच्या सहकार्याने शहरातील नागरी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी सहा स्टार्टअप कंपन्यांची निवड झाली आहे. कोल्हापूर स्टार्टअप मिशन सुरू आहे. 'आयआयटी कानपूर'चे तांत्रिक सहकार्य घेऊन कोल्हापूर मनपा आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ संयुक्तपणे हा प्रयोग राबवत आहेत. (kolhapur startup mission selected six companies for handling civic issues)
कोल्हापूरच्या विकासाकरिता राबवल्या जात असलेल्या अभिनव उपक्रमाची सुरुवात याच वर्षी जानेवारी महिन्यात झाली. कोल्हापूर स्टार्टअप मिशन या उपक्रमाचे उद्घाटन पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आलेले शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर (Raghunath Anant Mashelkar) यांनी केले. याप्रसंगी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil), आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil), आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे (Kadambari Balkawade) आणि आयआयटी कानपूरचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण, हवेची गुणवत्ता, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, ई-गव्हर्नन्स, वाहतूक या नागरी समस्यांवर उपाय शोधण्यासाठी स्टार्टअप कंपन्यांकडून संकल्पना मागवण्यात आल्या. तरुण पिढीला नागरी प्रश्न हाताळण्याची, ते संयमाने आणि सामंजस्याने सोडवण्याची सुवर्णसंधी मिळावी या हेतूने हा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळाला.
कोल्हापूरच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी ६२२ स्टार्टअप कंपन्यांनी अभिनव संकल्पना सादर केल्या. विशेष म्हणजे संकल्पना सादर करणाऱ्या ६२२ पैकी १२७ स्टार्टअप कंपन्या कोल्हापूरमधील होत्या. संकल्पना तपासून स्टार्टअप कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. उत्तरे समजून छाननी करण्याची प्रक्रिया झाली. अखेर तीन फेऱ्यांनंतर सहा स्टार्टअप कंपन्यांची कोल्हापूरच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी निवड झाली.
नागरिकांच्या सहभागातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोल्हापूर स्टार्टअप मिशन हा उपक्रम राबवला जात आहे. अभिनव कल्पनांच्या माध्यमातून प्रश्न सोडवून विकासाला गती देण्याचा प्रयत्न कोल्हापूर मनपा करत आहे. स्टार्टअपच्या मदतीने अनेकांना रोजगार मिळेल. कुशल, बुद्धिमान तरुण पिढी आणि प्रशासन यांना परस्पर सहकार्यातून काम करता येईल. सरकारी नियमांच्या चौकटीत परंपरागत विचार करत काम करणाऱ्या प्रशासनाला वेगळा विचार करुन समस्या सोडवण्याची संधी मिळेल; ही बाब लक्षात घेऊन कोल्हापूर मनपा उत्साहाने 'कोल्हापूर स्टार्टअप मिशन' राबवत आहे.
'कोल्हापूर स्टार्टअप मिशन'ला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे मनपा प्रशासनाचा हुरूप वाढला आहे. पुरस्कार विजेत्या सहा स्टार्टअपची कोल्हापूरच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी मदत होईल, असा विश्वास मनपा प्रशासनाने व्यक्त केला. कोल्हापूरमध्ये अनेक उद्योगांची प्रगती झाली. करवीरवासिनीच्या या नगरीने अनेक उद्योजक घडवले. आता नागरी प्रश्न सोडवण्याच्या निमित्ताने स्टार्टअपला प्रगतीची आणि कोल्हापूरला विकासाची संधी मिळणार आहे. कोल्हापूर मनपा स्टार्टअपच्या सहकार्याने शहरातील नागरी प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहे, असे आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.
ज्या स्टार्टअपना विजेते जाहीर करण्यात आले. त्या स्टार्टअपना पुरस्काच्या रुपाने मनपा प्रशासनाने विशेष मान दिला. कोल्हापूरच्या विकासाकरिता स्टार्टअपला विशेष पाठिंबा मिळणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली.
ज्यांचे सादरीकरण (Presentation) व्यावहारिक वाटले अशा स्टार्टअपला प्रत्यक्ष कामाची संधी दिली जाणार आहे, असे आमदार ऋतुराज पाटील आणि मनपा आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी जाहीर केले. स्टार्टअपची मदत घेण्याचा उपक्रम महाराष्ट्रात आणखी मोठ्या प्रमाणावर अन्यत्रही व्हायला हवा. यातून नागरी समस्या लवकर सोडवण्यास मदत होईल, असा विश्वास कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.