kolhapur will be silent for 100 seconds to pay homage to chhatrapati shahu maharaj : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापूरमध्ये शंभर सेकंद स्तब्ध राहून मानवंदना दिली जाणार आहे. ही मानवंदना शुक्रवार ६ मे २०२२ रोजी दिली जाईल. शाहू महाराजांना मानवंदना देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मंत्री आणि नेते शुक्रवारी कोल्हापूरमध्ये असतील. कोल्हापूर जिल्ह्यात शाहू महाराजांच्या कार्याचा जागर करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
राजश्री शाहू महाराजांचे निधन ६ मे १९२२ या दिवशी झाले होते. या घटनेला शुक्रवार ६ मे २०२२ रोजी १०० वर्षे होत आहेत. या निमित्ताने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना सर्व कामकाज/व्यवहार १०० सेकंद थांबवून मानवंदना दिली जाणार आहे.
कोल्हापूरमध्ये आपत्कालीन सूचना देण्यासाठी उभारलेल्या स्पीकरवरून बिगुल वाजवून पूर्वसूचना दिली जाईल. यानंतर १०० सेकंद सर्व कामं थांबवून आणि स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना मानवंदना दिली जाईल. चौकाचौकात स्वयंसेवक उभे राहणार आहेत. ते शिट्टी वाजवून स्तब्धता क्षणाची सर्व वाहनचालकांना जाणीव करून देतील. वाहने जागेवर थांबवली जातील.