Kolhapur-Sangli flood: पूरग्रस्तांचे दुःख ऐकून शर्मिला ठाकरेही गहिवरल्या

कोल्हापूर
Updated Aug 14, 2019 | 16:32 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Kolhapur-Sangli flood: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूरग्रस्तांसाठी मुंबईहून मदत पाठवली असून, पक्षाच्या नेत्या शर्मिलाताई ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा सुरू केला आहे. पूरग्रस्तांशी त्या संवाद साधणार आहेत.

maharashtra navnirman sena sharmila thackeray
पूरग्रस्तांचे दुःख ऐकून शर्मिला ठाकरेही गहिवरल्या  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात मदतीचा ओघ; राजकीय पक्ष, संस्थांची मदत
  • पुणे-मुंबईहून विविध पक्षांचे नेते पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर; मदतकार्यासह पूरग्रस्तांच्या गरजा समजून घेतल्या
  • शर्मिला ठाकेर यांचा कऱ्हाड पूरग्रस्त भागात दौरा; सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातही भेटी देणार

कोल्हापूर : सांगली, सातारा, कोल्हापूर परिसरात झालेल्या अभूतपूर्व पावसानं मोठं नुकसान केलय. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात आणि सांगली शहरासह कृष्णा नदीच्या काठावरील गावांमध्ये मोठी हानी झाली आहे. पुराच्या पाण्यात अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. सातार जिल्ह्यात कऱ्हाड शहरात कृष्णा नदीचे पाणी घुसल्याने तेथेही घरांची मोठी पडझड झाली आहे. संसार उपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. ब्रह्मनाळ येथे बोट पलटी होऊन दुर्दैवी जीवितहानी झाली. आता कोल्हापूर सांगली परिसरात पुराचे पाणी ओसरू लागल्याने मदत कार्याला वेग आला आहे. शहर आणि जिल्ह्याच्या बाहेरूनही मदत यायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूरग्रस्तांसाठी मुंबईहून मदत पाठवली असून, पक्षाच्या नेत्या शर्मिलाताई ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा सुरू केला आहे. तिन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाला त्या भेटी देणार आहेत.

 

 

‘पोरी आमचं सगळं गेलं गं...’

सांगली, सातारा, कोल्हापूर परिसर हा आर्थिकदृष्ट्या सधन. ऊस, शेती उद्योग धंदे, सहकार आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून या पट्ट्यात रोजगाराची साधनं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली. त्यामुळं या जिल्ह्यातील माणूस स्वाभिमानी कधी कोणापुढं न झुकणारा. पण, गेल्या आठ दिवसात पावसानं या परिसराला असं काही झोडपलं की या स्वाभिमानी माणसाच्या घराचं छप्परच उडालं. पै अन् पै जोडून उभारलेला संसार डोळ्यादेखत वाहून गेला. आज, पाठिचा कणा मोडलेल्या या माणसाला आधाराची गरज आहे. त्याच्या पाठीवर कोणी तरी हात ठेवून त्याला लढ म्हणायची गरज आहे. मदतीचा ओघ सुरू झालाय. पण, दिलासा देणारेही पुढे येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शर्मिलाताई ठाकरे यांनी कऱ्हाड परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तेथील वृद्ध महिलांनी ठाकरे यांच्या खांद्यावर मान टाकून अश्रूंना मोकळी वाट करून दिली. त्यावेळी शर्मिला ठाकरे यांनाही अश्रू अनावर झाले. कऱ्हाड परिसरात पाटण कॉलनीला पुराचा मोठा तडाखा बसला. त्या भागाची ठाकरे यांनी पाहणी केली. त्यावेळी ठाकरे यांनी पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. ‘पोरी आमचं सगळं गेलं गं...’ या एका पूरग्रस्त वृद्ध महिलेच्या शब्दानंतर शर्मिला ठाकरेही गहिवरल्या.

 

 

कृष्णाकाठच्या गावांना भेटी

दरम्यान, शर्मिला ठाकरे कृष्णा नदीच्या पट्ट्यातील पूरग्रस्त भागांना भेटी देणार आहेत. कऱ्हाडमधून पुढे त्या, सांगली पट्ट्यातील भागाला भेटी देणार असून, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक फटका बसलेल्या शिरोळ तालुक्याला त्या भेट देणार आहेत. शिरोळ तालुक्यात टाकवडे, शिरोळ तसेच पूरग्रस्त इचलकरंजी शहराला त्या भेट देणार आहेत. त्यानंतर सायंकाळी पुन्हा कऱ्हाड मुक्कामी येतील. तेथेही त्या पूरग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापुराच्या तडाख्यामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी बोलून दाखवली होती. तसेच पूरस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीकाही केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
Kolhapur-Sangli flood: पूरग्रस्तांचे दुःख ऐकून शर्मिला ठाकरेही गहिवरल्या Description: Kolhapur-Sangli flood: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूरग्रस्तांसाठी मुंबईहून मदत पाठवली असून, पक्षाच्या नेत्या शर्मिलाताई ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा सुरू केला आहे. पूरग्रस्तांशी त्या संवाद साधणार आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...