महाराष्ट्र विकास आघाडीचा भाजपला पहिला झटका

कोल्हापूर
Updated Dec 14, 2019 | 10:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Maharashtra Vikas Aghadi: राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीने सत्ता स्थापन केली असून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आहेत. आता याच आघाडीने भाजला एक जोरदार झटका दिला आहे. 

maharashtra vikas aghadi candidate pravin mane won dattawad shirol zp bypoll election bjp pramod patil kolhapur marathi news
महाराष्ट्र विकास आघाडीचा भाजपला पहिला झटका 

कोल्हापूर: शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात समसमान वाटपावरुन तिढा निर्माण झाला. यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसोबत एकत्र येत सत्तास्थापन केली. याच तिन्ही पक्षांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बनवलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीचं आता राज्यात सरकार बनलं. याच महाराष्ट्र विकास आघाडीने भाजप उमेदवाराचा पराभव करत पहिला विजय मिळवला आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील दतवाड पोट निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे तर भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीने प्रवीण माने यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपने प्रमोद पाटील यांना रिंगणात उतरवलं होतं. या पोट निवडणुकीत आघआडीचे उमेदवार प्रवीण माने यांना ८ हजार १ मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार प्रमोद पाटील यांना ७ हजार ३९६ मते मिळाली. 

अशा प्रकारे महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाल्यावर झालेल्या या पोट निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराने विजय मिळवत भाजप उमेदवाराचा पराभव केला आहे. दतवाड पोट निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झालं होतं. या निवडणुकीत ६३ टक्के इतकं मतदान झालं होतं. या विजयानंतर महाराष्ट्र विकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. शिवसेना फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर ठाम होती तर भाजप मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नव्हतं. त्यामुळे दोन्ही पक्षांत तिढा निर्माण झाला. यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसोबत चर्चा सुरु केली. त्याच दरम्यान अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला आणि देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, अवघ्या चार दिवसांतच अजित पवारांनी आपल्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. परिणामी अवघ्या ८० तासांतच भाजपचं राज्यातील सरकार कोसळलं. यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी सत्तास्थापनेचा दावा करत राज्यात सत्तास्थापन केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी