कोल्हापूरकरांनो... आजपासून वढा मटणाचा झणझणीत रस्सा...

कोल्हापूर
Updated Jan 14, 2020 | 14:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

गेल्या अनेक दिवसांपासून मटणापासून वंचित असलेल्या कोल्हापूरकरांना आज अखेर मटण खाता येणार आहे. मटण विक्रेते कृती समितीने आजपासून ५२० रूपये प्रति किलो दराने उत्तम प्रतीच्या मटणाची विक्री सुरू करण्याचा निर्णय घेतला

Mutton sale at Rs. 520 in Kolhapur started today
कोल्हापूरकरांनो... आजपासून वढा मटणाचा झणझणीत रस्सा...  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरात मटणाच्या दरांवरून वाद निर्माण झाला होता.
  • मटण विक्रेते कृती समितीने आजपासून ५२० रूपये प्रति किलो दराने उत्तम प्रतीच्या मटणाची विक्री सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • या वादावर तोडगा निघाल्याने ग्राहक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिक यांना दिलासा मिळाला आहे.

कोल्हापूर: गेल्या अनेक दिवसांपासून मटणापासून वंचित असलेल्या कोल्हापूरकरांना आज अखेर मटण खाता येणार आहे. मटणप्रेमींना अनेक दिवस मटणविक्री बंद असल्याने मटणाची चव चाखता आली नव्हती. मात्र मटण विक्रेते कृती समितीने आजपासून ५२० रूपये प्रति किलो दराने उत्तम प्रतीच्या मटणाची विक्री सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरात मटणाच्या दरांवरून वाद निर्माण झाला होता. मात्र, आता या वादावर तोडगा निघाल्याने ग्राहक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिक यांना दिलासा मिळाला आहे.

कोल्हापूरात मटणाची दरवाढ झाल्यानंतर मटण दरवाढविरोधी कृती सिमितीने प्रति किलो ४८० रूपये दराने मटणाची विक्री व्हावी असा आग्रह केला होता. मात्र, हा दर परवडत नसल्याचे सांगत मटण विक्रेत्यांनी थेट मटणाची विक्रीच बंद ठेवली. कित्येक दिवस यावर काहीच तोडगा निघाला नाही. ऐन नवीन वर्षाच्या वेळीच मटणाची विक्री बंद केल्याने कोल्हापूरकरांचा थर्टीफर्स्टही कोरडाच झाला. मात्र, आजच्या या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिकांनादेखील मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. मटणविक्री बंद असल्याने हॉटेल व्यावसायिकांना केवळ चिकन विकावे लागत होते. 

सर्वात आधी कोल्हापूरातील कसबा बावडा या उपनगरात मटण दरवाढीचा मुद्दा निघाला होता. तिथेच या वादाची सुरूवात झाली. या परिसरातील मटण विक्रेत्यांनी ५६० ते ५८० रूपये किलो या दराने मटणविक्री सुरू केली होती. त्यानंतर आवजवी भाव वाढवल्याने ग्राहकांनीही मटणाकडे पाठ फिरवली आणि परिणामी येथील दुकाने बंद पडू लागली. मात्र, नदीपलिकडे मटण ४६० रूपये किलो दराने मिळत असताना गावात मात्र मटण विक्रेते आर्थिक लूट करत असल्याचा आक्षेप लोकांनी घेतला. त्यानंतर हा वाद सर्वत्र पसरला. संपूर्ण कोल्हापूरात मटण विक्री बंद झाल्याने झणझणीत मटण कोल्हापूरकरांना मिळत नव्हते. आता कृती समितीने यावर तोडगा काढत आजपासून मटण विक्री सुरू केली आहे. अद्यापही मटण ५२० रूपये प्रति किलो या दरात उपलब्ध आहे. तेव्हा आता कोल्हापूरकरांनो, तुम्ही आजपासून मटणाचा झणझणीत आस्वाद घेऊ शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी