Jayant Patil Hoarding : जयंत पाटलांच्या होर्डिंगवरून सर्व ‘पवार’ गायब! ‘या’ कारणाची सर्वाधिक चर्चा

विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवरून सर्व ‘पवार’ गायब झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Jayant Patil Hoarding
जयंत पाटलांच्या होर्डिंगवरून पवारांचा फोटो का झाला गायब?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जयंत पाटील यांच्या होर्डिंगवरून ‘पवार’ गायब
  • होर्डिंगवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
  • विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याची नाराजी?

Jayant Patil Hoarding : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष (State President) जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या होर्डिंगवरून (Birthday Hoarding) पक्षाध्यक्ष शरद पवार, (Sharad Pawar) विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि लोकसभेच्या गटनेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे फोटो गायब झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक जयंत पाटील (Pratik Jayant Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी होर्डिंग झळकले होते. त्यावर केवळ वडील जयंत पाटील आणि आजोबा राजारामबापू पाटील (Rajaram Bapu Patil) यांचेच फोटो दिसत होतो. नेहमी दिसणारे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे फोटो मात्र गायब झाले होते. यावरून आता उलटसुलट चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याची नाराजी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद मिळेल, अशी अपेक्षा असल्याची चर्चा होती. 2019 साली महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं, तेव्हा अजित पवारांऐवजी जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल, अशीही चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात अजित पवार यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्यात आली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेलं बंड, पहाटेचा शपथविधी या प्रकारानंतर त्यांच्यावर पक्षाकडून कडक कारवाई केली नाही, तरी किमान त्यांना उपमुख्यमंत्रीपद तरी दिलं जाणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुुळे जयंत पाटील यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र त्यानंतर राजकीय गणितं बदलली आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं आली. 

अधिक वाचा -  President Election Results 2022 Live Updates: राष्ट्रपती निवडणूक २०२२, मतमोजणी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू

जयंत पाटलांकडून नाराजीचा संदेश

सत्तेवर असताना उपमुख्यमंत्रीपद मिळालं नसलं तरी आता विरोधात बसावं लागल्यावर किमान विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद तरी आपल्याकडे येईल, असं जयंत पाटील यांना वाटत होतं, अशी चर्चा आहे. मात्र या पदानेही हुलकावणी दिल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. आपली ही नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांनी पुत्राच्या वाढदिवसाचं निमित्त साधल्याची चर्चा सांगली जिल्ह्यात रंगत आहे. एरवी कुठल्याही होर्डिंगवर हमखास दिसणारे शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो अचानक गायब झाल्यामुळे जयंत पाटील नेमका काय संदेश देऊ इच्छित आहेत, याचे वेगवेगळे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. 

अधिक वाचा - Fun over GST : शशी थरूर, पनीर बटर मसाला आणि जीएसटी, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

वेगळा विचार?

मूळचे काँग्रेस पक्षीय असणारे जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर शरद पवारांसोबत त्या पक्षात आले. त्यानंतर गेली दोन दशकं त्यांनी राष्ट्रवादीतूनच राजकारण केलं. मात्र पक्षात डावलले जात असल्याची भावना प्रबळ होऊ लागल्याने ते वेगळा विचार करत आहेत का, याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. हा केवळ पक्षांतर्गत नाराजी दाखवण्यासाठी केलेला उपाय आहे की त्यातून आगामी वेगळ्या भूमिकेचे संकेत जयंत पाटील देऊ पाहत आहेत, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 

अधिक वाचा - Heatwave in Europe: युरोपात आलं मोठं संकट, उष्णतेची तीव्र लाट; तब्बल 1700 लोकांचा मृत्यू, रस्तेही वितळले

नेतेपुत्रांचे संकेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या पोस्टरवरूनही शरद पवार आणि जयंत पाटील यांचे फोटो गायब झाले होते. त्यानंतर आता प्रतिक जयंत पाटील यांच्या पोस्टरवरूनही फोटो गायब झाले आहेत. त्यातून राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल नसल्याचेच संकेत मिळत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी