Shiv Sena: 'या' व्यक्तीमुळेच शिवसेना फुटली', बंडखोर आमदार शंभूराज देसाईंचा सरळसरळ आरोप

शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर थेट आरोप केले आहेत.

shiv sena split because of sanjay raut shambhuraj desai straightforward allegation
'या' व्यक्तीमुळेच शिवसेना फुटली', शंभूराज देसाईंचा थेट आरोप 
थोडं पण कामाचं
  • बंडखोर आमदारांचं थेट टार्गेट फक्त संजय राऊत
  • शंभूराज देसाईंनी देखील केली संजय राऊतांवरच टीका
  • संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली, अनेक बंडखोर आमदारांचा आरोप

सातारा: 'खासदार संजय राऊतांमुळेच (Sanjay Raut) शिवसेना (ShivSena) फुटली त्यामुळे त्यांना मी महत्त्व देत नाही. तर शरद पवार (Sharad Pawar) साहेब जे बोलतात ते कधीच खरे ठरत नाही.' असं म्हणत माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दोन्ही दिग्गज नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे. 

राज्यामध्ये बंड झाल्यानंतर या बडांमध्ये शंभूराज देसाई यांनी शिवसेनेची फारकत घेत शिंदे गटांमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या पंधरा-वीस दिवसांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडीनंतर आज (६ जुलै) आमदार शंभूराजे देसाई हे साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधत आपण शिवसेनेतून शिंदे गटामध्ये सामील का झालो याबद्दलच्या अनेक घटना पत्रकारांसमोर सांगितल्या. 

याचवेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांनी पक्षांमध्ये वेळोवेळी केलेली ढवळाढवळ आणि आमदारांना दिलेली दुजाभावची वागणूक याचं घटनेला विरोध करत ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. 

संजय राऊतांच्या बोलण्याला किंमत देत नाही!

संजय राऊत यांनी प्रत्येक बंडखोर आमदाराला ५० कोटी देण्यात आल्याचा आरोप देखील केला होता. याच आरोपाला उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की, 'पैसे घेतल्याचा पुरावा द्यावा राजकारण सोडून घरी बसेन. म्हणून आम्ही संजय राऊतांच्या कोणत्याही वक्तव्याला जास्त किंमत देत नाही.' असं देखील आमदार शंभूराज देसाई यांनी बोलताना सांगितलं.

'शरद पवार जे बोलतात ते कधीच पूर्ण होत नाही'

दरम्यान, यावेळी शंभूराज यांनी शरद पवार यांच्यावर देखील तिरकस टीका केली. राज्यांमध्ये मध्यवर्ती निवडणुका लागतील असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नवं सरकार अस्तित्वात आल्यावर केलं होतं. याबद्दलही शंभूराज देसाई यांना सवाल विचारण्यात आला. तेव्हा शंभूराज देसाई म्हणाले की, 'हे काही सत्य नाही. शरद पवार जे बोलतात ते कधीच पूर्ण होत नाही. हे आपल्याला अनेकदा अनुभवायला आलं आहे.' 

'शरद पवार यांनी म्हटलं होतं की, २५ वर्ष महाविकास आघाडीचं सरकार चालेल. ते अडीच वर्षातच पडलं. आता ते म्हणतात मध्यावधी निवडणुका लागणार. त्यामुळे तसं काहीच होणार नाही. हे सरकार संपूर्ण अडीच वर्ष चालेल.' असा दावा शंभूराज देसाई यांनी केला आहे.

अधिक वाचा: CM शिंदेंच्या स्वागतासाठी पत्नीने स्वत: वाजवला बँड!

बंडखोर आमदार पुढे सरसावले, शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात

दुसरीकडे राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता बंडखोर आमदार हे आपआपल्या मतदारसंघात परतत असून गेल्या पंधरा दिवसात त्यांच्यावर जी टीका झाली त्याला उत्तर देण्यासाठी ते पुढे सरसावले आहेत. अनेक बंडखोर आमदार आता अत्यंत आक्रमकपणे शिवसेनेच्या नेतृत्वाला उत्तर देत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

शंभूराज यांच्याशिवाय ठाकरे सरकारमध्ये मंत्री पद गमावलेले संजय राठोड यांनीही संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्यामुळेच आपण शिवसेनेतून बाहेर पडलो असं ते यावेळी म्हणाले.  

या सगळ्या टीकांचा रोख लक्षात घेता पुढच्या काळात संजय राऊत विरुद्ध बंडखोर आमदार असा सामना महाराष्ट्रात नक्कीच पाहायला मिळणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी