जेवढं अंतर जमीन आणि आस्मानमध्ये आहे तेवढं माझं मताधिक्य असणार: उदयनराजे

Udayan Raje Bhosale Satara By-Election: लोकसभा पोटनिवडणुकीत आपला मोठया मताधिक्याने विजय होईल असा विश्वास साताऱ्याचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.

udayan raje bhosale claims that is going to win big in the satara by elections
जेवढं अंतर जमीन आणि आस्मानमध्ये आहे तेवढं माझं मताधिक्य असणार: उदयनराजे  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • उदयनराजे भोसलेंनी पोटनिवडणुकीत व्यक्त केला विजयाचा विश्वास
  • साताऱ्यातील सर्वच भाजप उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा 
  • सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंविरुद्ध श्रीनिवास पाटील यांच्यात रंगणार लढत

सातारा: 'माझं मताधिक्य हे जेवढं अंतर जमीन आणि आस्मानमध्ये आहे तेवढं असणार आहे.' असं म्हणत उदयनराजे यांनी आपल्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे. आज (२१ ऑक्टोबर) राज्यात विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक देखील घेण्यात आली. यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्वांचंच लक्ष हे या पोटनिवडणुकीकडे देखील आहे. दरम्यान, मतदानानंतर उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधताना विजय आपलाच असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वीच उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या खासदार पदाचा राजीनामा देखील दिला होता. त्यामुळेच साताऱ्यात विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभा निवडणूक देखील पार पडली 

नेमकं काय म्हणाले उदयनराजे? 

'माझ्यासह आमचे इतर सहा उमेदवार देखील हे विजयी झाल्यात जमा आहेत. हा आत्मविश्वास आहे. कारण की, आम्ही लोकांमध्ये फिरतो. तसंच मला गोपनीय रिपोर्ट देखील मिळाले आहेत. त्यामुळे विजय निश्चित आहे. माझा लकी नंबर हा सात आहे आणि बरोबर सात लोकांनीच उमेदवारी अर्ज केले होते. ईव्हीएमवर  माझा १ नंबर आहे. त्यामुळे एक नंबरनेच मी लीडने विजयी होणार. तर २४ तारखेला निकाल आहे. माझा वाढदिवस पण २४ तारखेला असतो. अंकशास्त्रानुसार २४ आकडा हा चांगला असतो. त्यामुळे राज्यात २८८ जागी भाजप-शिवसेना युतीच्या सर्व जागा निवडून याव्यात हीच भवानी चरणी प्रार्थना केली. पावसाचा मतदानावर काहीही परिणाम होणार नाही. काल मी हवामानाचा अंदाज घेतला ते म्हणाले झिरझिर पाऊस पडेल. पण लोकं मतदान करतील. त्यामुळे मला विश्वास आहे की, जेवढं अतंर जमीन आणि आस्मानमध्ये आहे तेवढं माझं मताधिक्य असणार.' असं म्हणत उदयनराजेंनी आपल्या विजय पक्का असल्याचं ठासून सांगितलं. 

याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील टीका केली. 'कालच्या पावसात सगळी घाण निघून गेली, त्यावेळेस त्यांची नाही तर लोकांची चूक झाली होती.' असं म्हणत उदयनराजे यांनी शरद पवारांना टोला हाणाला. 

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते? 

साताऱ्यातील सभेत शरद पवार यांनी उदयनराजेंवर जोरदार टीका केली होती. 'लोकसभा निवडणुकीदरम्यान साताऱ्यात उमेदवार निवडण्यात माझी चूक झाली होती. पण आता मला ही चूक दुरुस्त करायची आहे. त्यामुळे साताऱ्यातील पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून द्या.' असं म्हणत शरद पवारांनी नुकतेच भाजपवासी झालेल्या उदयनराजेंवर निशाणा साधला होता.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी