वर्धा नदीत बोट उलटून एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले; चौघांचे मृतदेह हाती

लातूर
भरत जाधव
Updated Sep 14, 2021 | 14:41 IST

 जिल्ह्यातील वरूड तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना सकाळी घडली.

Eleven members of the same family drowned when their boat capsized in Wardha river
वर्धा नदीत बोट उलटून एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • बुडालेले सर्वजण बोटीतून फिरण्यासाठी गेले होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
  • सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका बोटीतून महादेव मंदिराकडे जात असताना पर्यटकांची बोट नदीपात्रात उलटली.
  • या दुर्घटनेत सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अमरावती :  जिल्ह्यातील वरूड तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना सकाळी घडली. आतापर्यंत नावाड्यासह चौघांचे मृतदेह सापडले असून इतर लोकांना शोध बचाव पथकाने सुरू केला आहे. बेनोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बुडालेले सर्वजण बोटीतून फिरण्यासाठी गेले होते, अशी प्राथमिक  माहिती मिळत आहे. 

गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीला उपस्थित राहण्यासाठी त्यांचे जवळचे नातेवाईक सोमवारी तेथे पोहचले होते. सोमवारी दशक्रिया विधी आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी सर्व जण श्री क्षेत्र झुंज येथे पोहचले. या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा असून पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका बोटीतून महादेव मंदिराकडे जात असताना पर्यटकांची बोट नदीपात्रात उलटली. त्यात कुटुंबातील 11जण बुडाले. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे.

या दुर्घटनेत सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मदत व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे. नदीत बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोहचले. आतापर्यंत चौघांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि चिमुकलीचा समावेश आहे.  दरम्यान, स्थानिक आमदार देवेंद्र भुयार यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. “वर्धा नदीच्या तिरावर ही घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासनासह स्थानिक लोक उपस्थित आहेत. यामध्ये ११ जण बुडाले असून तीन जणांचे मृतदेह हाती लागले आहे. उर्वरित लोकांचा शोध घेतला जात आहे,” असे स्थानिक आमदार देवेंद्र भुयार म्हणाले.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी