बीड : राज्यात अपघातांच्या मालिका सुरू आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात होत असल्याच्या बातमी येत आहेत. आज सकाळी बीडच्या धामणगाव घाटात कारचा एक भीषण अपघात झाला असून यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान या अपघाताविषयी पोलीस अजून तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध व्यापारी टेकवाणी यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. त्यांच्या कुटुंबातील ४ जणांचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गाडीमध्ये ५ जण होते. पुण्याहून बीडकडे येत असताना धामणगाव घाटात त्यांच्या कारचा अपघात झाला. कार थेट रस्त्याच्या कडेला धडकल्याने यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
खरंतर, टेकवाणी एक प्रतिष्ठीत व्यापारी कुटुंब आहे. या अपघातामध्ये टेकवाणी कुटुंबातील सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी यांच्यासह आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून ४ मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.अधिक माहितीनुसार, घाटात अपघात झाल्यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. पण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या अपघाताचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.