उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे-तडवळे या गावातील शेतकरी दिलीप शंकर ढवळे यांनी १२ एप्रिल २०१९ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांने त्यांच्या खिशामध्ये सुसाइड नोटही लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं की, 'तेरणा कारखाना चालू करण्यासाठी वसंतदादा बँकेत सातबारा गहाण ठेवून चार एकर जमिनीवर बोजा चढविण्यास शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर व विजय दंडनाईक यांनी भाग पाडले आणि त्या जमिनीचा तीन वेळेस लिलाव पुकारला व माझी मानहानी केली. सततचा दुष्काळ व यांनी केलेली फसवणूक यामुळे माझे व माझ्या कुटुंबाचे खूप हाल झाले. त्यामुळे मी याला कंटाळून आत्महत्या करीत आहे.'
यावरून सुसाइट नोटवरुन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीअंती पोलीस निरीक्षक वेव्हळ यांनी पोलीस ठाणेतर्फे फिर्यादी होऊन तक्रार दाखल केली. १४ सप्टेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला होता. याच प्रकरणी आता पोलिसांनी थेट आवाहन देखील केलं आहे की, 'जर कोणी शेतकरी. ऊस तोड मुकादम किंवा इतर कुणाचीही तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना, वसंतदादा नागरी सहकारी बँक, उस्मानाबाद जय लक्ष्मी शुगर प्रायव्हेट लिमिटेड, यासाठी विजय दंडनाईक व खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अशाप्रकारे फसवणूक केली असल्यास त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कळंब यांच्याशी संपर्क साधून सर्व पुराव्यानिशी आणि कागदपत्र सोबत घेऊन भेट घ्यावी.' असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील यांनी केले आहे.
याबाबतची एक प्रेस नोटच जिल्हा माहिती कार्यलयाकडून जाहीर करण्यात आली आहे. सध्या या संपूर्ण घटनेचा तपास उरविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील हे करत आहेत.
दरम्यान, असं असलं तरीही आता सध्या राज्यात शिवसेनेचाच गृहमंत्री आहे. अशावेळी अशा प्रकारच्या तक्रारीनंतर आणि खुद्द पोलिसांनीच आवाहन केल्यानंतर शिवसेनेच्या खासदारावर काही कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.