लातूर : लातूर (Latur) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुळे भाऊ असल्याचा गैरफायदा घेत भावाने आपल्या वहिनीवर बलात्कार केल्याची घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना लातुरातील रिंगरोड परिसरात घडली. या प्रकरणी पती, दीर, सासू आणि सासऱ्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी पीडितेचा पती आणि दिराला अटक केली आहे. सहा महिन्यांपूर्वीच विवाहितेचे लग्न झाले होते.
दोन जुळ्या भावातील (Twins in Latur) एकाचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. या दोन्ही जुळ्या भावांमध्ये खूपच साम्य होते. त्यामुळे घरातील नवविवाहित मुलीला आपला नवरा आणि दीर कोण आहे ते यातील फरकच कळला नाही. याचाच गैरफायदा घेत दिराने भावजयीवरच अत्याचार केला. पीडितेला सहा महिन्यांनंतर हा प्रकार लक्षात आला.
ही तरुणी माहेरी गेली होती. यावेळी तिचा जुळा दीर घ्यायला गेला असता तिने सासरी जाण्यास नकार दिला. यानंतर तिला तिच्या आई वडिलांनी सासरी नांदायला न जाण्याचे कारण विचारले. यावेळी तिने आपल्या आई-वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात पीडित विवाहित तरुणीने तक्रार दिली. तिने दिलेल्या तक्रारीवरुन पती, दीर, सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही जुळ्या भावांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.