सरकारशी चर्चा करणाऱ्यांचा समाजाशी काहीही संबंध नाही : मराठा क्रांती मोर्चा

लातूर
Updated Jul 29, 2018 | 21:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Maratha Morcha Protest : मुंबईत मुख्यमंत्र्यांची मराठा समाजाच्या काही समन्वयकांसोबत आज (रविवार) बैठक पार पडली. पण ही चर्चा ज्यांच्यासोबत झाली त्यांचा समाजाशी कोणताही संबंध नसल्याची भूमिका आता मराठा क्रांती मोर्चाच्या राजस्तरीय बैठकीत घेण्यात आली आहे.

maratha kranti morcha
फाईल फोटो 

लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार नारायण राणे यांच्या उपस्थित आज (रविवार) मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांची मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याची घोषणाही केली. पण आता यामध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे.

मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेल्या समन्वयकांसोबत समाजाचा कोणताही संबंध नसल्याचा एक ठराव लातूरमधील मराठा क्रांती मोर्चाच्या राजस्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आला. सरकारला आमच्या मागण्या काय आहेत हे आधीच सांगितलं असल्यामुळे सरकारशी चर्चाच होणार नसल्याचं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. 

मराठा क्रांती मोर्चाच्या राजस्तरीय बैठकीचं आज लातूरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वेगवेगळ्या विषयावर या बैठकीत चर्चा झाली. त्याच दरम्यान, मुख्यमंत्री आणि मराठा क्रांतीतील इतर समन्वयकांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. पण या समन्वयकांचा आमच्याशी काहीही संबंध नसल्याचे आता लातूरमधील बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे यापुढे सरकार कोणाशी चर्चा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

'सरकारशी कोणतीही चर्चा नाही'

लातूरमधील बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत समन्वयकांनी असं स्पष्ट केलं की, 'आम्ही आमच्या ज्या काही मागण्या आहेत. त्याबाबतचं निवेदन हे सरकारला आधीच दिलं आहे. त्यामुळे आता आम्हाला कोणतीही चर्चा नको असून फक्त निर्णय हवा आहे.' 

१ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट म्हणजेच तब्बल ९ दिवस राज्यव्यापी आंदोलनाची हाक

दरम्यान लातूरमधील बैठकीत याशिवाय देखील काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. १ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट म्हणजेच तब्बल ९ दिवस राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यावेळी मराठा समाजातील आमदार आणि खासदारांच्या निवासस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलनं करण्यात येणार आहेत. 

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदनंतर आज (रविवार) मुंबईत मराठा आंदोलकांच्या समन्वयकांसोबत चर्चा केली. ही चर्चा पारदर्शीपणे व्हावी यासाठी या चर्चेचं थेट प्रसारणही करण्यात आलं होतं. यावेळी चर्चेला मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांसोबतच खासदार नारायण राणे काँग्रेस आमदार नितेश राणे हे देखील बैठकीला हजर होते. 
'बंद दरम्यान ज्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घेण्यात येतील पण ज्यांच्यावर पोलिसांवर हल्ले केल्याचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जाणार नाही.' अशी महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन

मागासवर्गीय आयोगाने आपला अहवाल सादर केल्यानंतर तातडीने या संदर्भात चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलविण्यात येईल. अहवाल तयार करण्यासाठी आयोगाचे काम वेगाने सुरू आहे. या संदर्भात मंत्रिमंडळ समितीने काल आयोगांच्या अध्यक्षांची भेट घेतली, तसेच मराठा समाजाच्या भावना आयोगापुढे मांडल्या. तसेच या भावना समजून घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली. आयोगाने अहवाल सादर केल्यावर विशेष अधिवेशनात चर्चा केली जाणार आहे. तसेच यात काही त्रुटी असल्यास दूर केल्या जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

आंदोनलकर्त्यांवरील गंभीर नसलेले गुन्हे मागे घेणार...

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गंगापूर येथील काकासाहेब शिंदे या तरूणीने जलसमाधी घेतली. त्यानंतर प्रकरण चिघळले. त्याच्या निषेधार्थ मराठा समाजातर्फे मुंबईसह राज्यभरात बंद पुकारण्यात आला. या आंदोलनता काही ठिकाणी हिंसाचार करण्यात आला. त्यामुळे आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पण यातील पोलिसांवर हल्ला, जाळपोळ, मारहाण या गंभीर गुन्ह्यांव्यतिरिक्त इतर गुन्हे मागे घेण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.  

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी