नांदेडमध्ये 2 शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर

लातूर
Updated Jan 20, 2020 | 13:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

नांदेडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर तिच्याच २ शिक्षकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.

Rape
नांदेडमध्ये विद्यार्थिनीवर २ शिक्षकांनी केला बलात्कार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बिलोली इथल्या शंकरनगर इथं शाळेत विद्यार्थिनीवर शिक्षकांनी केला बलात्कार
  • बलात्कारानंतर पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना याबाबत कुठेही वाच्यता न करण्याची धमकी
  • विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर, ५ आरोपींविरोधात गुन्हा दाखल, यात बलात्कार करणारे २ शिक्षक त्यांना मदत करणाऱ्या तिघांचा समावेश

नांदेड: देशात एकीकडे निर्भयाच्या दोषींना फाशी देणार असल्यानं समाधान व्यक्त केलं जात असतानाच, राज्यात अत्याचाराची परिसीमा गाठणारी एक धक्कादायक घटना घडलीय. नांदेड जिल्ह्यात एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर २ शिक्षकांनी  बलात्कार केल्याची घटना घडलीय. नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील ही घटना आहे. यात पीडित विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. याप्रकरणी रामतीर्थ पोलीस स्टेशनमध्ये पाच आरोपी शिक्षकांविरोधात पॉक्सो कायदा आणि कलम ३७६ अंतर्गत १८ जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये २ शिक्षकांसोबतच त्यांना मदत करणाऱ्या तिघांचाही समावेश आहे.

पीडित मुलगी सहाव्या वर्गात शिकत असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिलोलीमधील शंकरनगर इथं असलेल्या साईबाबा विद्यालयात सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला सांस्कृतिक कार्यक्रमाचा व्हिडिओ दाखवायचाय असं सांगून आरोपी शिक्षकांनी शाळेत थांबवून ठेवलं. एका खोलीमध्ये त्यांनी विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवला आणि तिच्यावर अत्याचार केले. मुलीनं घरी येताच आपल्या कुटुंबियांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पीडित मुलीला कुटुंबियांनी लगेच खाजगी रुग्णालयात दाखल केलं आणि मुख्याध्यापकाकडे शिक्षकांची तक्रार केली.

हे प्रकरण कळताच विद्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे पीडित विद्यार्थिनीच्या आईनं शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई शिक्षकांवर केली नाही. उलट या घटनेची वाच्यता कुठेही करू नये यासाठी त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घेण्यात आलं, अशी माहिती पीडित विद्यार्थिनीच्या आईने पोलिसांना दिली.

याप्रकरणाबाबत पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या कुटुंबाशी संपर्क साधला. कुटुंबीयांना विश्वासात घेऊन संपूर्ण घटनेची माहिती मिळवली. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात आरोपी शिक्षकांसोबत त्यांना मदत करणाऱ्या मुख्याध्यापक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. याप्रकरणात आरोपी शिक्षकांची पाठराखण करणाऱ्या मुख्याध्यापक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलीय. दरम्यान, या प्रकरणाविरोधात गावकरी एकवटले असून गावकऱ्यांनी निषेध करण्यासाठी बंद पुकारलाय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी