Pankaja Munde Vs Dhanjay Munde: धनंजय मुंडे हे 'त्या' नंबरचे मंत्री असल्यानं निधी आणण्याची ताकद नाही; पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

लातूर
भरत जाधव
Updated Dec 20, 2021 | 11:59 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader) आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांचा सर्वोत्कृष्ट मंत्र्यांच्या यादीत 32 वा क्रमांक लागल्याची माहिती नुकतीच उघड झाली. या मुद्द्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं.

pankaja munde criticizes dhananjay munde at a campaign rally in beed
ताई 4 मंत्र्यांमध्ये होत्या, तर दादा 32 व्या नंबरचे मंत्री  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वडवणी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांच्यावर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
  • कोणाला तुरुंगामध्ये टाकायचे, कोणाचे घर बरबाद करायचे असले राजकारण आम्हाला गोपीनाथ मुंडे यांनी शिकवलं नाही.- पंकजा मुंडे

Pankaja Munde Vs Dhanjay Munde:बीडः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader) आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांचा सर्वोत्कृष्ट मंत्र्यांच्या यादीत 32 वा क्रमांक लागल्याची माहिती नुकतीच उघड झाली. या मुद्द्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं. पालकमंत्री निवडणूक तोंडावर आल्यानंतर निधीच्या घोषणा करत आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांनी पैसे का दिले नाहीत. पैसे आणण्याची त्यांची ताकद नाही, ते राज्यातील 32व्या क्रमांकाचे मंत्री आहेत, या शब्दांमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टीका केली. बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत पंकजा मुंडे बोलत होत्या. 

दोन वर्षे काय टाळ कुटत बसला होता काय?

 'पालकमंत्री बीड जिल्ह्यातील निवडणूक प्रचारात नगर पंचायतीला शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करतात, जिल्ह्यातील पाच नगर पंचायतीला पाचशे कोटी देणार आहात तर मग दोन वर्षे काय टाळ कुटत बसला होता काय? जिल्ह्याचे भले करण्याची भूमिका पालकाची असली पाहिजे. कोणाला तुरुंगामध्ये टाकायचे, कोणाचे घर बरबाद करायचे असले राजकारण आम्हाला गोपीनाथ मुंडे यांनी शिकवलं नाही. तुरुंगामध्ये घालण्याची भाषा करणाऱ्यांनी आता थोडं थांबावे, आता बीड जिल्ह्यालाही किरीट सौमय्या मिळाले आहेत. त्यामुळे आम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. आमचे सरकार होते, तेव्हा मी पहिल्या चार मंत्र्यांत होते. मी काही 32व्या क्रमांकाची मंत्री नव्हते. यांचे भविष्य फार चांगले नाही राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे. महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही आणि यांचा कबाडा होणार आहे.'

‘तुमच्या ताई पहिल्या 4 मध्येच’

वडवणी नगरपंचायत या कार्यक्रमातील भाषणात त्या म्हणाल्या, तुमच्या ताई जेव्हा निवडून आल्या, मंत्री झाल्या. तेव्हा त्या पहिल्या चार मंत्र्यांमध्येच होत्या. असं 32 व्या नंबरवर त्या कधी गेल्या नाहीत.’ उत्कृष्ट मंत्र्यांच्या यादीत धनंजय मुंडे यांचा 32 क्रमांक लागल्यामुळे पंकजा मुंडे यांनी ही टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी प्रचारसभेत दिलेल्या आश्वासनांवरही त्यांनी तोंडसुख घेतले.

दरम्यान, आष्टी येथील नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. त्या म्हणाल्या, 'देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जो संयम आहे, तो शिकण्यासारखा असल्याचं त्या म्हणाल्या. पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मतभेद असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात होती. पंकजा यांच्या या भाषणानंतर दोघांमधील मतभेद संपुष्टात आल्याचे संकेत मिळाले आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी