पिस्तुल प्रकरण : करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

लातूर
भरत जाधव
Updated Sep 06, 2021 | 15:46 IST

बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Pistol case: Karuna Sharma remanded in judicial custody for 14 days
पिस्तुल प्रकरण : करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • करुणा शर्माची मंदिर परिसरामध्ये महिलेला जातीवाचक शिवीगाळ
  • न्यायालयात हजर केल्यानंतर करुणा शर्मा यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी परळी पोलिसांनी मागितली
  • न्यायालयात करुणा शर्मा यांनी आपली बाजू स्वत: मांडली

बीड :  बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याचबरोबर त्यांच्या वाहनचालकास एक दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली गेली आहे. परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना आज न्यायालयात दाखल करण्यात आले होते. 

करुणा शर्मा काल परळीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने, एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात आले होते दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर, न्यायलयाने वरील निर्णय दिला.

करुणा शर्मा यांनीच मांडली स्वतःची बाजू

न्यायालयात हजर केल्यानंतर करुणा शर्मा यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी परळी पोलिसांनी मागितली होती. यावेळी करुणा शर्मा यांनी स्वतः आपली बाजू न्यायालयासमोर मांडली. सुरुवातीला त्यांना मराठीमध्ये लिहिलेला मजकूर समजला नाही. त्यामुळे त्यांनी ही माहिती हिंदीमधून सांगण्यात, यावी अशी मागणी केली. याप्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सहा. सरकारी अभियोक्ता अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले. तर, करुणा शर्मा यांचे वकील पोहोचू न शकल्याने न्यायालयासमोर त्या स्वतःच स्वतःची बाजू मांडली.न्यायालयाने दोन्हींची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतर करुणा शर्मा यांनी जामिनासाठी याचिका देखील दाखल केली आहे. सध्या त्यावर सुनावणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आपण तपास कार्यात सहकार्य करण्यास तयार असून, आपल्याला जामीन मंजूर करावा, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे.

सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणाऱ्या करुणा शर्मा काल रविवारी परळीत दाखल झाल्या होत्या. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांच्या वाहनामध्ये पिस्तूल आढळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तर, समाज माध्यमातून धनंजय मुंडेंच्या विरोधातील सर्व पुरावे जाहीर करण्याचा इशारा देऊन करुणा या परळीत दाखल झाल्या होत्या. करुणा शर्मा यांनी मंदिर परिसरामध्ये महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. म्हणून शर्मासह मोरे यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी