Anil Deshmukh Arrested, 100 कोटी वसुली प्रकरण : 13 तास चौकशीनंतर अनिल देशमुखांना रात्री 12 वाजता अटक, वाचा परमबीर सिंहचे पत्र ते अटकेच्या कारवाईची कहाणी

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 02, 2021 | 08:31 IST

Anil Deshmukh Arrested :राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांना अखेर ईडीने (Enforcement Directorate) अटक केली आहे.

Anil Deshmukh Arrested
परमबीर सिंहचे पत्र ते देशमुखांची अटक, कशी केली ईडीने कारवाई  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 13 तास मॅरेथॉन चौकशीनंतर देशमुखांची अटक
  • परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर देशमुखविरोधात शंभर कोटी वसुली प्रकरणाचा तपास सुरू झाला.
  • सीबीआयकडून क्लीनचीट मिळवण्यासाठी देशमुखांकडून सीबीआय अधिकाऱ्याला लाच देण्यात आली.

Anil Deshmukh Arrested : मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांना अखेर ईडीने (Enforcement Directorate) अटक केली आहे. 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात त्यांना ईडीने रात्री 12 वाजता अटक केली. देशमुख दोन महिन्यांपासून बेपत्ता होते. ईडीने अनेक वेळा समन्स दिल्यानंतरही ते ईडी कार्यालयात हजर राहत नव्हते. परंतु काल सकाळी साडे दहा-अकराच्या सुमारास ते अचानक ईडी कार्यालयात हजर झाले. ईडी कार्यालयात दाखल झाल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची 13 तास मॅरेथॉन चौकशी केली. 

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गेल्या काही दिवसांपूर्वी पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुखांनी आम्हाला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.

परमबीर सिंहांच्या पत्रात काय होतं?

पत्रानुसार निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचं युनिट हेड होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले होते. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले, तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये जमा होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येऊ शकते.

देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश देत होते. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, असे आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहिले होते. 

देशमुखांच्या घरी सीबीआयचे छापे

या प्रकरणात सीबीआयची एन्ट्री झाल्यानंतर साधरण 24 एप्रिल रोजी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घर आणि इतर मालमत्तांवर छापा टाकला. मुंबईसह दहा ठिकाणी सीबीआयने धाड टाकली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयनं धाडी टाकल्या होत्या.

वडिलोपार्जित घरावर ईडीची धाड 

सेंट्रल बुरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन म्हणजे सीबीआयने  देशमुखांविरोधात नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारावर ईडीने मनी लॉंडरिंग प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यातून चौकशीतून ईडीने विविध ठिकाणी धाडी टाकल्या अनेकांचे जबाब घेतले. या चौकशीमध्ये ईडीला अनेक धागेदोरे हाती लागले होते. 
 साधरण जुलै महिन्यात ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील वडिलोपार्जित घरावर ईडीने धाड टाकली होती. अनिल देशमुख यांचे नागपूरपासून ६० किलोमीटर अंतरावरील काटोल शहरातील घर आणि त्यांचे काटोल जवळली वाडविहिरा गावातील घर अशा दोन घरांवर ईडीने धाड टाकली होती. नागपूरच्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एनआयटी कॉलेजवरही ईडीने छापा टाकला होता. 

ईडीकडून देशमुखांची मालमत्ता जप्त

काही दिवसांपूर्वीच ईडीने अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची 4.20 कोटी रुपयांच्या किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये वरळीतील 1.54 कोटी रुपये किंमतीचा एक निवासी फ्लॅट आणि रायगड जिल्ह्यातील उरण येथील धुतुम गावातील 2.67 कोटी किंमतीची 25 एकर जमीन यांचा समावेश आहे.   

देशमुखांचे दोन्ही पीए गजाआड

अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांचे दोन्ही पीए पालांडे आणि कुंदन यांच्याविरोधात ईडीच्या हाती महत्त्वपूर्ण पुरावे लागले होते. त्याच पुराव्यांच्या आधारच त्यांना बेड्या ठोकल्या होत्या.

अनिल देशमुख यांना पाच वेळा समन्स 

ईडीने अनिल देशमुख यांना पाच वेळा समन्स बजावले. पण देशमुख एकदाही चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले नाही. त्यांनी पाचव्या समन्स नंतर वकिलामार्फत निवेदन दिले पण चौकशीला उपस्थित राहणे टाळले. 

लूकआऊट नोटीस

ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस काढली होती. अनिल देशमुख यांनी देशाबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करू नये यासाठी लूकआऊट नोटीस काढण्यात आली होती. 

क्लीनचीटसाठी सीबीआय अधिकाऱ्याला लाच 

देशमुख प्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठी सीबीआयच्या एका फौजदारानेच लाच घेतल्याचे समोर आले होते. देशमुखांना क्लिनचीट मिळावी यासाठी त्यांच्याच जवळच्या व्यक्तीकडून लाच देण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयचा लाचखोर फौजदार अभिषेक तिवारी, नागपूरस्थित वकील डागा आणि अन्य एका जणाविरोधात सीबीआयने कारवाई केली. सीबीआयच्या प्राथमिक चाैकशीत अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिल्याचे वृत्त शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हा अहवाल फुटला कसा याची सीबीआयने चाैकशी सुरू केली असता देशमुख यांच्या ताफ्यातील लोकांनी फौजदार तिवारीला लाच दिल्याचे उघडकीस आले. या प्रकरणातच जावई चतुर्वेदी आणि वकील डागाचीही चौकशी करण्यात आली. 

अनिल देशमुखांचे जावई सीबीआयच्या ताब्यात

ईडीने देशमुख यांना पाचवेळा समन्स बजावला होता, परंतु देशमुख मात्र वकिलामार्फत आपली बाजू मांडत असायचे.  दरम्यान सीबीआयने क्लीन चीट दिल्याचे वृत्त आल्यानंतर सीबीआयने आपला तपास सुरू केला. त्यानंतर क्लीन चीटसाठी लाच घेतल्याची बाब समोर आली. त्यानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. 

दरम्यान तब्बल दोन महिने गायब असलेले अनिल देशमुख काल सोमवारी (01 नोव्हेंबर रोजी ) ईडीच्या कार्यालयात हजर झाले. विशेष म्हणजे परमबीर सिंह हे गायब झाले देशातून पळून गेले असा बातम्या आल्यानंतर देशमुखांची ईडी कार्यालयापुढील हजेरी जर भुवया उंचावणारी आहे. यापुर्वी ईडीने त्यांना समन्स देऊनही ते चौकशीसाठी हजर राहत नव्हते. 

अनिल देशमुख चौकशीला सहकार्य करत नाही, 12 वाजता अटकेची कारवाई

अनिल देशमुख सोमवारी सकाळी 11.30 ते 11.45 वाजताच्या दरम्यान ते ईडी कार्यालयात हजर झाले. त्यानंतर रात्री 12 पर्यंत त्यांची चौकशी झाली. म्हणजेच 13 तास मॅरेथॉन चौकशी झाली. या चौकशीदरम्यान ते ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते. ईडीचे अधिकारी त्यांना विविध विषयांवर बोलतं करण्याच्या प्रयत्न करत होते. मात्र देशमुख काहीतरी लपवू पाहत होते. अनेक प्रयत्नांतरही देशमुख उत्तरं द्यायला, माहिती द्यायला टाळाटाळ करत होते. अखेर रात्री 12 वाजता ईडीने देशमुख यांना अटक करण्याचा निर्णय घेतला.

ईडीकडून झालेली अटक चुकीची, देशमुखांच्या वकिलाची प्रतिक्रिया

अनिल देशमुख यांच्यावर सेक्शन 19 पीएमएलए अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. आज सकाळी 11 च्या आसपास त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. ईडी अनिल देशमुख यांच्यासाठी पोलिस कोठडी मागेल तर ही अटक कशी चुकीची आहे, हे सांगण्याचा अनिल देशमुख यांचे वकील प्रयत्न करतील. अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर त्यांचे वकील इंद्रपाल सिंह मध्यरात्री ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी अनिल देशमुख यांची भेट घेतली. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास इंद्रपाल सिंह ईडी कार्यालयातून बाहेर पडले. अनिल देशमुख यांची अटक चुकीची असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी