महाराष्ट्रात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १४ तुकड्या

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 23, 2022 | 16:19 IST

14 units of NDRF and SDRF in Maharashtra : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस आहे. पूर परिस्थिती बाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात केल्या आहेत. 

14 units of NDRF and SDRF in Maharashtra
महाराष्ट्रात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १४ तुकड्या  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १४ तुकड्या
  • पावसाचा 'यलो अलर्ट'
  • राज्यात १४५७९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

14 units of NDRF and SDRF in Maharashtra : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस आहे. पूर परिस्थिती बाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात केल्या आहेत. 

मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१)-२, पालघर-१,रायगड-महाड-२, ठाणे-२,रत्नागिरी-चिपळूण-२,कोल्हापूर-२,सातारा-१, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १२ तुकड्या तैनात आहेत. नांदेड-१, गडचिरोली-१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

महाराष्ट्रात एक जून पासून आज पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे  २८ जिल्हे व २९९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अशंत: नुकसान झालेले आहे.

पावसाचा 'यलो अलर्ट'

महाराष्ट्रात शनिवार २३ जुलै २०२२ आणि रविवार २४ जुलै २०२२ या दोन दिवशी निवडक जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पालघर, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा 'यलो अलर्ट' दिला आहे. मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये मंगळवार २६ जुलै २०२२ पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पालघर जिल्हा तसेच नाशिक आणि पुणे जिल्ह्याचा घाट परिसर येथे शनिवार २३ जुलै २०२२ रोजी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुणे जिल्ह्यात रविवार २४ जुलै २०२२ पासून पावसाचा जोर ओसरल्याचे दिसेल. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात  शनिवार २३ जुलै २०२२ रोजी पावसाची शक्यता नाही. राज्याच्या काही भागांमध्ये शनिवार २३ जुलै २०२२ आणि रविवार २४ जुलै २०२२ या दोन दिवशी ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट होईल. ज्या भागांमध्ये पाऊस पडणार नाही पण ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट होईल अशा भागांमध्ये वारे ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

महाराष्ट्रात १४५७९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

महाराष्ट्रात शुक्रवार २२ जुलै २०२२ रोजी २५१५ रुग्ण आणि ६ मृत्यू यांची नोंद झाली तर २४४९ जण बरे झाले. राज्यात १४५७९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ८० लाख २९ हजार ९१० कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ६७ हजार २८० बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४८ हजार ०५१ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी २८ लाख ३४ हजार ९५७ कोरोना चाचण्यांपैकी ८० लाख २९ हजार ९१० पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८४ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.६९ टक्के, रिकव्हरी रेट ९७.९७ टक्के आहे.

साथीचे आजार

पावसाच्या आगमनासोबतच मुंबईसह राज्याच्या अनेक भागांमध्ये साथीचे आजार पसरण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

पावसाळी आजारांपासून संरक्षणासाठी अशी घ्या काळजी

  1. उघड्यावरचे अन्न खाऊ नका. 
  2. ताजे सकस अन्न खा.
  3. शुद्ध पाणी प्या. 
  4. दूषित पाणी पिऊ नका
  5. शरीरावर कुठेही जखम झाली वा कापले तर लगेच जखम स्वच्छ करून त्या ठिकाणी अँटीसेप्टिक क्रीम लावा. मोठी दुखापत वा मोठी जखम असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.
  6. पावसाळ्यात घरात तसेच कामाच्या ठिकाणी स्वच्छता राखा आणि पाणी साठणार नाही तसेच पाण्यावर डासांची पैदास होणार नाही याची काळजी घ्या. डासांना प्रतिबंध करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करा.
  7. पावसात भिजणे टाळा आणि भिजलात तर लगेच घरी आल्यावर शरीर कोरडे करा. कपडे बदला. अंगावर ओले कपडे ठेवणे टाळा. सतत ओलसर दमट वातावरणात राहिल्यास तब्येत बिघडण्याचा, जंतुसंसर्ग होण्याचा धोका वाढतो हे लक्षात ठेवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी