२६ जुलैला पुन्हा अतिवृष्टी होणार? पाहा काय म्हणतय स्कायमेट

मुंबई
Updated Jul 23, 2019 | 12:34 IST

26th July: येत्या २६ जुलै रोजी मुंबईत पुन्हा एकदा अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. स्कायमेटने वर्तवलेल्या या अंदाजामुळे पुन्हा एकदा मुंबई पाण्याखाली जाणार का? असा प्रश्न आहे.

Mumbai Rain file photo
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • मुंबईत पुन्हा अतिवृष्टी?
  • २६ जुलैला मुसळधार पावसाचा अंदाज
  • २८ जुलै ते २८ जुलै रोजी पावसाचा जोर
  • स्कायमेटने वर्तवला अंदाज

मुंबई: जुन महिन्याच्या शेवटी मुंबई, कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली. साधारणत: आठवडाभर पडलेल्या या पावसामुळे तलावांच्या पाण्यात चांगलीच वाढ झाली तर मुंबईत झालेल्या जोरदार पावसाने मुंबईचे रस्ते, लोहमार्ग ठप्प झाले होते. मात्र, नंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतली. त्यानंतर आता येत्या तीन दिवसांत पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. येत्या २६ जुलै रोजी मुंबईत अतिवृष्टी होणार असून २७ आणि २८ जुलै रोजी पावसाचा जोर असेल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

२६ जुलै २००५ रोजी मुंबईसह आसपासच्या परिसरात जोरदार अतिवृष्टी झाली होती. अगदी कमी काळात झालेल्या या अतिवृष्टीमुळे मुंबई शहर, उपनगर, ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भाग पाण्याखाली गेला. या अतिवृष्टीचा फटका लाखो नागरिकांना बसला होता. २६ जुलैच्या त्या पावसाची आठवण काढली असता सर्वांनाच टेन्शन येतं. आता पुन्हा एकदा तशाच प्रकारची स्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कारण, खासगी हवामान सर्वेक्षण संस्था असलेल्या स्कायमेट ने २६ जुलै रोजी पुन्हा अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात, कोकणातील काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे. तर मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचं स्कायमेटने म्हटलं आहे.

काय सांगतोय स्कायमेटचा अंदाज?

  1. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये २४ आणि २५ जुलै रोजी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
  2. महाराष्ट्रात २६ जुलै ते २८ जुलै या कालावधीत बहुतांश भागांत जोरदार पावसाची शक्यता
  3. २६ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता 
  4. २७ जुलै आणि २८ जुलै रोजी पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज 
  5. याच काळात गुजरातच्या पूर्वेकडील भागात आणि राजस्थानमध्ये चांगला पाऊस पडेल
  6. गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ या भागांत २८ जुलै रोजी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज 

गेल्या रविवारच्या मध्यरात्री मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि पाऊस सुरू झाला होता. मध्यरात्री सुरू झालेल्या या पावसामुळे सर्वाच्याच मनात चिंता निर्माण झाली होती. मात्र, नंतर पावसाचा वेग कमी झाला आणि सकाळी तर पावसाने विश्रांती घेतली. 

पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथे २५ जुलै ते २८ जुलै या कालावधीत पावसाचं आगमन होईल. या कालावधीत दोन्ही राज्यांमध्ये चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच बिहार आणि उत्तरप्रदेशातील काही भागांत पावसाचा प्रभाव कमी होईल असंही स्कायमेटने म्हटलं आहे.

२६ जुलै २००५ ला झालेला 'तो' पाऊस

२६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीचा सर्वांनाच फटका बसला. हा पाऊस कुणीही विसरू शकत नाही. प्रत्येक वर्षीच्या पावसात या दिवसाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. या दिवशी झालेल्या मुसळधार पावसात अडकलेल्या प्रत्येक नागरिकाचे वेगवेगळे अनुभव आहेत. कुणी कार्यालयात अडकलं होतं, कुणी लोकल ट्रेनमध्ये, कुणी रस्त्यावर अडकले होते. पावसाचा वेग हा वाढतच होता आणि त्यात समुद्राला आलेल्या भरतीमुळे पाणी रस्त्यांवर साचलं होतं. या काळात मुंबईकरांना आलेला अनुभव हा खूपच भयानक होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
२६ जुलैला पुन्हा अतिवृष्टी होणार? पाहा काय म्हणतय स्कायमेट Description: 26th July: येत्या २६ जुलै रोजी मुंबईत पुन्हा एकदा अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. स्कायमेटने वर्तवलेल्या या अंदाजामुळे पुन्हा एकदा मुंबई पाण्याखाली जाणार का? असा प्रश्न आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...