28 suicide: महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या २८ कर्मचाऱ्यांची आत्महत्या

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 29, 2021 | 15:41 IST

28 suicide of ST Employee :महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या २८ कर्मचाऱ्यांची आत्महत्या केल्या आहेत. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करावे, अशी मागणी एसटी महामंडळाचे कर्मचारी करत आहेत. हीच मागणी भाजपकडून आमदार पडळकर यांनी केली.

28 MSRTC employees commit suicide in Maharashtra
महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या २८ कर्मचाऱ्यांची आत्महत्या 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या २८ कर्मचाऱ्यांची आत्महत्या
  • कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करावे - एसटी कर्मचारी संघटना
  • जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना तेच एसटी कर्मचाऱ्यांना द्या, पोलीस बळाचा वापर करू नका - आमदार पडळकर

28 suicide of ST Employee । मुंबईः वेळेत पगार मिळत नाही. सरकारी सेवा असूनही एसटी महामंडळ (ST)वाढत्या महागाईच्या तुलनेत कमी पगार देते, यामुळे आर्थिक अडचणी वाढत आहेत; अशा स्वरुपाची कारणे देत महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या २८ कर्मचाऱ्यांची आत्महत्या (Suicide) केल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये; असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्यावतीने आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. (28 MSRTC employees commit suicide in Maharashtra)

कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करावे. यामुळे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना लागू असणारे पगार, भत्ता याबाबतचे नियम एसटीच्या कर्मचाऱ्यांना लागू होतील. पगारवाढ होईल आणि अनेक प्रश्न सुटतील, असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

आर्यन खानसाठी मंत्रीमंडळ कामाला लागते पण महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाचे २८ मराठी कर्मचारी आत्महत्या करतात आणि राज्य शासनाला काही पडलेलं नाही. जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना तेच एसटी कर्मचाऱ्यांना’ द्या. पोलीस बळाचा वापर करू नका.अन्यथा एखाद्याने जीव गमावला तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची असेल; असा इशारा पडळकर यांनी दिला. ऐन दिवाळीच्या तोंडावर अहमदनगर विभागातील शेवगाव आगारात दिलीप खटके या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्याने आत्महत्या केली; असेही पडळकर म्हणाले.

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी बुधवार २७ ऑक्टोबर पासून संप पुकारल्यानंतर जाग आलेल्या महाराष्ट्र शासनाने काही घोषणा केल्या पण कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्यांवर अद्याप निर्णय घेतलेला नाही. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता दिला जाईल. तसेच सध्या असलेल्या घरभाड्यात वाढ करू, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली. वार्षिक वेतनवाढीसंदर्भात एसटी महामंडळ सकारात्मक असून याबाबत दिवाळीनंतर बैठक आयोजित करण्यात येईल, असे अनिल परब म्हणाले. 

सध्या एसटी कर्मचाऱ्यांना १२ टक्के आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता आहे. परिवहन मंत्र्यांनी केलेली घोषणा अंमलात आल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनाही २८ टक्के महागाई भत्ता लागू होईल, असे संकेत राज्य शासनाकडून दिले जात आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या घरभाड्यात वाढ करू, अशी घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली आहे.

संपामुळे राज्यातले २५० पैकी १८२ एसटी डेपो बंद होते. कर्मचाऱ्यांनी एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करुन घेण्याची मागणी केली आहे. या मागणीबाबत राज्य शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, घोषणांचे राजकारण करण्यापेक्षा एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करुन घ्यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारचे धोरण २८ आत्महत्यांना कारणीभूत

महाविकास आघाडी सरकारचे एसटी कर्मचाऱ्यांबाबतचे धोरणच २८ आत्महत्यांना कारणीभूत आहे, असा आरोप महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करू असे सांगता आणि दुसऱ्या बाजूला एसटी कर्मचारी वैफल्यातून आत्महत्या करतात. त्यामुळे आता तरी हे कठोर सरकार जागे होणार आहे की नाही. अन्यथा एसटी कर्मचाऱ्यांच्या जर अशा आत्महत्या होत असतील तर महाराष्ट्रामध्ये आगडोंब उसळेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा गंभीर इशारा दरेकर यांनी दिला.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी