3 fire fighters injured during fire drill in Mumbai : मुंबई : मुंबईत माटुंगा येथे झालेल्या 'फायर ड्रील'मध्ये 'फायर ब्रिगेड'चे ३ जवान जखमी झाले. जखमी झालेल्या ३ जवानांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. 'फायर ब्रिगेड'च्या तिन्ही जखमी जवानांवर मुंबई महापालिकेच्या शीव येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
माटुंगा पूर्व येथील श्री निधी या इमारतीमध्ये 'फायर ड्रील' सुरू होते. उंच इमारतीत आग लागली तर काय करायचे याचे प्रशिक्षण नागरिकांना देण्यासाठी 'फायर ड्रील' सुरू होते. 'फायर ड्रील' करण्यासाठी 'फायर ब्रिगेड'च्या ३ गाड्या आल्या होत्या. 'फायर ड्रील'साठी नियंत्रित अशी आग लागवण्यात आली. ही आग विझविण्यासाठी जवान गाडीतील पाण्याचे पाइप काढून वेगाने इमारतीच्या दिशेने धावणार होते. पण फायर ब्रिगेडच्या एका गाडीचे चाक पुढे सरकले आणि जवळच उभ्या असलेल्या गाडीतून पाण्याचे पाइप काढत असलेले ३ जवान दबले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या ३ जवानांपैकी एकाचे पाय पूर्णपणे चिरडले गेले. जखमी झालेल्या जवानांना मुंबई महापालिकेच्या शीव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ज्या जवानाचे पाय पूर्णपणे चिरडले गेले त्याचे पाय गुडघ्यापर्यंत कापून टाकावे लागल्याचे समजते. इतर दोन जवानांची प्रकृती स्थिर आहे आणि सुधारत आहे.
श्री निधी इमारतीमधील 'फायर ड्रील'च्यावेळी झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी दुर्घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. आग विझवताना काही वेळा जवान जखमी झाल्याच्या घटना घडतात. पण वाहन उभे असताना दुर्घटना घडल्यामुळे चौकशी होणे आवश्यक असल्याचे नगरसेविका राजेश्री शिरवडकर म्हणाल्या.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.