एसटी महामंडळाचा वाहननामा, बसचे बदलते रुपडे

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 02, 2022 | 10:10 IST

75th anniversary of msrtc, MSRTC BUS LOOK : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation - MSRTC) अर्थात एसटी महामंडळाने बुधवार १ जून २०२२ रोजी ७५व्या वर्षात म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने जाणून घेऊ एसटी महामंडळाच्या बसचे बदलते रुपडे.

75th anniversary of msrtc, MSRTC BUS LOOK
एसटी महामंडळाचा वाहननामा, बसचे बदलते रुपडे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • एसटी महामंडळाचा वाहननामा
  • बसचे बदलते रुपडे
  • एसटी महामंडळाने बुधवार १ जून २०२२ रोजी ७५व्या वर्षात म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले

75th anniversary of msrtc, MSRTC BUS LOOK : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation - MSRTC) अर्थात एसटी महामंडळाने बुधवार १ जून २०२२ रोजी ७५व्या वर्षात म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने जाणून घेऊ एसटी महामंडळाच्या बसचे बदलते रुपडे.

पहिली एसटी बस
नगर ते पुणे ते नगर मार्गावर १ जून १९४८ रोजी धावली. पेट्रोलवर चालणारी बहुतांश लाकडाचा वापर असलेली बस, काथ्याची ३० आसने, खिडक्यांना ताडपत्री. नगर ते पुणे भाडे आठ आणे.

मालवाहक ट्रक
एसटीने ८३५ ट्रकसह १९५३ मध्ये मालवाहक सेवा सुरू केली. पुण्यात १९६१ मध्ये पानशेत धरण फुटले त्यावेळी तसेच १९६७ मध्ये कोयना भूकंपानंतरच्या मदतकार्यात हे ट्रक सहभागी झाले.

लाल पिवळी बस
दापोडी कार्यशाळेने १९६० मध्ये तयार केलेली ५० आसनी अॅल्युमिनियमची गंजरोधक लाल पिवळी बस ही आजही एसटीची ओळख आहे. एसटीच्या गाड्यांचे रुप पालटले तरी या बसमुळे एसटीला मिळालेले लालपरी हे नाव आजही कायम आहे.

सैन्याची बस
दापोडी कार्यशाळेने १९६२च्या भारत-चीन आणि १९६५च्या भारत -पाकिस्तान अशा दोन युद्धांच्या काळात सैन्यासाठी मोठ्या प्रमाणावर बस तयार केल्या. 

लक्झरी बस अर्थात आराम बस
दापोडी कार्यशाळेने १९६४ मध्ये टू बाय टू अशी ३० आसनांची व्यवस्था असलेली लक्झरी बस सेवेत दाखल केली. बसच्या खिडक्यांना पडदे, छताला पंखे आणि दिवे तसेच रेडिओ आणि स्पीकरची व्यवस्था होती. ही बस पांढऱ्या आणि निळ्या अशा दोन रंगात रंगविली होती.

एसी बस
पांढरा आणि निळा अशा दोन रंगात रंगवलेल्या एसी बस १९६५ मध्ये सेवेत दाखल. टू बाय टू ३० आसनी. दापोडीत तयार झाली पहिली एसी बस.

दुमजली ट्रेलर बस
पुणे जिल्ह्यातील दापोडी कार्यशाळेने १९६७ मध्ये दुमजली ट्रेलर बस तयार केली. बसचा वाहन ओढणारा भाग ट्रॅक्टरच्या रचनेतून घेतलेला. ही लेलँड कंपनीच्या मदतीने तयार केलेली बस. पाठीमागील दुमजली आसनांचा भाग महिंद्रा कंपनीच्या मदतीने तयार केला होता. ही बस नाशिक ते नाशिक रोड स्टेशन मार्गावर धावत होती.

शयन आसनी बस
ही ५० आसने आणि ८ शयनकक्ष असलेली बस १९७० मध्ये दापोडी कार्यशाळेने सेवेत दाखल केली. या प्रकारच्या फक्त दोन बस होत्या. एक मुंबई ते पणजी आणि दुसरी मुंबई ते कोल्हापूर मार्गावर होती. या बस लेलँडने पुरविलेल्या वाहन सांगाड्यावर तयार केल्या होत्या.

पुढच्या दाराची बस
लेलँड कंपनीने पुरविलेल्या वाहन सांगाड्यावर दापोडी कार्यशाळेने ही बस तयार केली १९७० मध्ये सेवेत आणली. बसचे इंजिन पुढल्या चाकांच्या पुढे ठेवले होते. बसमध्ये ५६ आसने होती.

डिलक्स बस
ही टू बाय टू पुशबॅक आसन व्यवस्थेची बस. प्रत्येक आसनाला कव्हर, डोक्याला उशी, पडदे, रीडिंग लॅम्प, पंखे, मासिकं, रेडिओ, प्रवाशांसाठी बसमध्येच पिण्याच्या पाण्याची सोय. मोठ्या टिंडेड खिडक्या. ही बस १९९३ मध्ये सेवेत दाखल.

एसी डिलक्स
प्रवाशांसाठी १९९६ पासून एसी डिलक्स बससेवा सुरू झाली. आरामदायी आसने, गालीचा, रीडिंग लाइट, पिण्यासाठी गार पाण्याची बाटली, सूर्यप्रकाशापासून संरक्षण देणाऱ्या काचा, इंजिनचा आवाज आणि उष्णतेचा प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी घेतलेली काळजी, आवाज विरहीत चालक कक्ष. 

एअर बस
एसटीच्या सेवेत १९९८ मध्ये एअर सस्पेन्शनयुक्त बस दाखल. यात मागील बाजूस बसणाऱ्यांना प्रवासात कमी हादरे लागतात. पुशबॅक सीट, पडदे, रीडिंग लॅम्प या सोयींसह एसी आणि नॉन एसी श्रेणीत एअर बस सुरू. 

साधी बस
एसटीच्या सेवेत १९९९ पासून साधी बस दाखल. आसनांची उंची वाढली. आसनांचे गालिचे आणखी मऊ झाले. पाणीच्या मणक्याला त्रास होऊ नये अशी खबरदारी घेतली गेली. बसच्या छताला आतून ट्युबलाइट. गाडीत पुरेसा प्रकाश आणि हवा खेळती राहण्याची सोय. सरकत्या अर्थात स्लायडिंगच्या खिडक्या. बसच्या पुढील बाजूस दरवाजा.

मिनी आणि मिडी बस
ग्रामीण भागात ७ मीटर लांबीची वीस आसनी मिनी बस आणि डोंगराळ भाग तसेच जिथे घाटातून मोठा प्रवास करायचा आहे तिथे ९ मीटर लांबीची ३२ आसनी मिडी बस २००२ मध्ये सेवेत आली.

शिवनेरी
दादर-पुणे मार्गासाठी २००२ पासून व्होल्व्हो शिवनेरी एसी वाहतूक सुरू झाली आणि वेगाने लोकप्रिय झाली.

नवी साधी बस
एसटीच्या सेवेत २००३ मध्ये नवी साधी बस दाखल. प्रवासाचा शीण जाणवू नये म्हणून वाहनात मोल्डेड फोमचा वापर. आसनांसाठी विशिष्ट प्रकारचे रेक्झीन. पुरेसा प्रकाश आणि हवा खेळती राहण्याची सोय. सरकत्या काचा. अंतर्गत सजावटीसाठी अॅक्रेलिक प्लॅस्टिक. निळ्या आणि पांढऱ्या रंगात रंगविलेली बस.

परिवर्तन बस
साधी बस २००५ मध्ये परिवर्तन या नावाने आरायमदायी स्वरुपात सेवेत दाखल. आरामदायी बैठक, मोठ्या खिडक्या, चालकासाठी मोठी विंडशिल्ड, आकर्षक दर्शनी भाग, अनोखी रंगसंगती.

वारी बस
एसटीची बारा मीटर लांबीची ६५ आसने आणि २० उभे अशी ८५ प्रवाशांची बस. पुढील बाजूस प्रवासी दरवाजा, आरामदायी प्रवासाची सोय, थ्री बाय टू आसन व्यवस्था अशी वारीमार्गाची अर्थात गर्दीच्या मार्गाची बस.

सीएनजी बस
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ठाणे २ आगारातून मुंबई महानगर प्रदेशाच्या हद्दीत २००९ मध्ये सीएनजी बस सुरू केल्या. नंतर सीएनजी बसची संख्या वाढत गेली.

पुशबॅक हिरकणी
जागतिक महिला दिनाचे निमित्त साधून ८ मार्च २०१३ रोजी सर्व एशियाड बसचे नामांतर हिरकणी करण्यात आले. एसटीच्या ताफ्यात सध्या हिरव्या-पांढऱ्या रंगात हिरकणी बस आहेत. पुशबॅक आसने आणि एअर सस्पेन्शनच्या व्यवस्थेसह पुशबॅक हिरकणी बस सुरू झाल्या.

सिंहस्थ कुंभमेळा बस
नाशिकमध्ये २०१५ मध्ये झालेल्या 'सिंहस्थ कुंभमेळा'साठी हरित कुंभमेळा संकल्पनेतून हिरव्या रंगसंगतीमधील ५०० विशेष बसद्वारे ४३२१ फेऱ्या करून भाविकांची प्रवासाची मोठी सोय करण्यात आली.

शिवशाही
वाजवी दरात एसी प्रवासाची सोय करणारी शिवशाही बस हिरकरणी बस प्रमाणेच महाराष्ट्रातील सर्व शहरे आणि जिल्हे यांना जोडते. ही बस २०१७ पासून कार्यरत आहे.

लालपरी
साध्या परिवर्तन बस आणखी आरामदायी करण्यात आल्या. लालपरी २०१७ पासून सुधारित स्वरुपात सेवेत दाखल. सुधारित लालपरी माइल्ड स्टीलचा वापर करून तयार केली. टू बाय टू आसन व्यवस्था. आर्मरेस्ट, एरोडायनॅमिक डिझाइन ही नव्या बसची वैशिष्ट्ये.

नॉन एसी शयन आणि आसनी बस
नॉन एसी १५ शयन आणि ३० पुशबॅक आसनांची सोय असलेली आरामदायी बस. भाडे हिरकणी बस एवढेच. रीडिंग लॅम्प, मोबाईल चार्जिंग, पंखे आदी सोयी उपलब्ध. 

महाकार्गो २०२०
एसटी महामंडळाने शेतकरी, लघुउद्योजक, व्यापारी यांच्यासाठी २४ तास मालवाहतूक सोय देणारी सेवा सुरू केली. ही सेवा कोरोनाचे लॉकडाऊन सुरू असताना २०२० मध्ये कार्यरत झाली आणि २०२१ मध्ये सेवेचे नाव महाकार्गो असे करण्यात आले. 

एसटीच्या मुंबई कार्यशाळेतील पहिली बस
एसटीच्या मुंबईतील सांताक्रुझच्या कार्यशाळेने १९५० मध्ये लेलँड कंपनीच्या वाहन सांगाड्याचा वापर करून धातुची पहिली बस तयार केली. कच्चा माल बंगळुरूच्या हिंदुस्थान एअरक्राफ्ट, हैदराबादच्या अॅलन मेटल वर्क्स आणि चेन्नईच्या सिम्पसन लिमिटेड कंपनीने पुरविला होता. बसमध्ये उभ्या तीन आसनांच्या स्वरुपात व्यवस्था केली होती. एका बाजुला खिडकीला समांतर आसनांची व्यवस्था होती. 

पहिली आराम बस
एसटीत १९५० मध्ये मॉरिश कमर्शियल कंपनीच्या बस दाखल. या बस पुणे ते महाबळेश्वर मार्गासाठी वापरण्यात आल्या. या बस निलकमल आणि गिर्यारोहिणी नावाने ओळखल्या जात होत्या. या टू बाय टू आसनांच्या खिडक्यांना पडदे, बसमध्ये घड्याळ अशी सोय असलेल्या गाड्या होत्या.

दुमजली बस
पुणे जिल्ह्यातील दापोडी कार्यशाळेने १९८१ मध्ये ठाणे ते भिवंडी मार्गासाठी ९० आसनांच्या दुमजली बस तयार केल्या.

एशियाड
दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा अर्थात एशियात १९८२ मध्ये खेळाडूंची ने-आण करण्यासाठी एसटीने २०० आरामदायी बस तयार करून दिल्या होत्या. यापैकी ५० बस स्पर्धा संपल्यानंतर एसटीने पुन्हा विकत घेतल्या आणि महाराष्ट्रात कार्यरत केल्या. याच बस एशियाड नावाने ओळखल्या जातात. या एशियाड बस दादर ते पुणे मार्गावर सुरू झाल्या.

स्कूल बस
एसटीने ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी गाव ते शाळा असा मोफत प्रवास सुरू केला. या योजनेत राज्यातल्या २२ जिल्ह्यांतील १२५ तालुक्यांचा विचार करण्यात आला. प्रत्येक तालुक्याला पाच बस देण्यात आल्या. ही सेवा २०१२ पासून सुरू. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी