75th anniversary of msrtc : मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation - MSRTC) अर्थात एसटी महामंडळाने आज बुधवार १ जून २०२२ रोजी ७५व्या वर्षात म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. एसटीच्या ताफ्यात आता वेगवेगळ्या रंगरुपाच्या बस आहेत. पण पहिली लाल रंगाची एसटी बस आजही राज्यातील नागरिकांच्या आठवणींमध्ये कायम आहे. या बसमुळेच एसटीच्या गाड्यांना लालपरी म्हणायला सुरुवात झाली. एसटीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याला जोडले. यामुळे प्रवास करणे सोपे झाले.
एसटीची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. या बससोबत प्रवास सुरू झाला आणि १ जून २०२२ रोजी एसटी महामंडळाने ७५व्या वर्षात पदार्पण केले. मागच्यावर्षी एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन, भत्ते, वैद्यकीय सुविधा आदी द्यावे तसेच थकीत वेतन द्यावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी संप पुकारला. हा संप अनेक दिवस सुरू होता. पण आता एसटीचे बहुसंख्य कर्मचारी कामावर परतले आहेत.
संप काळात निधन झाल्यामुळे अथवा आत्महत्या केल्यामुळे काही कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होणार नाहीत हे स्पष्ट झाले. तर काही कर्मचाऱ्यांनी संप काळात उत्पन्नासाठी पर्यायी नोकरी किंवा भाजी विक्री, मासे विक्री अशा स्वरुपाचे छोटे व्यवसाय सुरू केले. हे कर्मचारी कामावर परतण्यास उत्सुक नाहीत. यामुळे रिक्त झालेल्या जागांवर कंत्राटी स्वरुपात भरती करून एसटीची सेवा पूर्ण क्षमतेने चालविण्याचे नियोजन महामंडळ करत आहे.
जुन्या दुःखद आठवणी मागे ठेवून पुढे जाण्यासाठी एसटी महामंडळाने यंदा राज्यातील सर्व एसटी डेपो (एसटी आगार) आणि एसटी बस स्थानके येथे सजावट करून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आगारातील सर्व बस स्वच्छ धुवून रस्त्यावर आणण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्रातील सर्व एसटी डेपो (एसटी आगार) आणि एसटी बस स्थानके येथे महामंडळाच्यावतीने पेढे वाटून एसटीचा वर्धापनदिन साजरा केला जाईल.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.