वारिस पठाण अडचणीत, अखेर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल 

मुंबई
पूजा विचारे
Updated Feb 22, 2020 | 14:12 IST

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (AIMIM) अर्थात एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कर्नाटकातल्या कलबुर्गी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

Waris pathan
वारिस पठाण अडचणीत, वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल  |  फोटो सौजन्य: ANI

बंगळुरूः  ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (AIMIM) अर्थात एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कर्नाटकातल्या कलबुर्गी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केलीय. आम्ही 15 कोटी असलो तरी 100 कोटींवर भारी आहोत असं म्हणत वारिस पठाण यांनी हिंदू-मुस्लिमांबाबत भाष्य केलं होतं.  १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये एका सभेत पठाण यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

आता कलबुर्गी पोलिसांनीही भारतीय दंड विधानाच्या कलम ११७, १५३ (दंगा भडकावण्याचा प्रयत्न) आणि कलम १५३ ए (दोन समूहांत घृणा निर्माण करण्याचा प्रयत्न) नुसार पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान यापूर्वी याच वक्तव्यासाठी पठाण यांच्या वक्तव्याविरोधात पुण्यामध्येही तक्रार दाखल झाली आहे. 

वारिस पठाण यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर समाजातील विविध स्तरांतून टीका करण्यात आली. एआयएमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील वारिस पठाण यांच्यावर कारवाई केलेली आहे.  पुढील आदेशापर्यंत त्यांना माध्यमांना बोलण्यास बंदी घातली आहे. तर औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी देखील वारिस पठाण यांच्या हिंदू-मुस्लिम वक्तव्यावर स्पष्टीकरण मागणार असल्याचं सांगितलं आहे. 

वारिस पठाण यांचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबईच्या भायखळा येथील माजी आमदार वारिस पठाण यांनी कर्नाटकातील गुलबर्गा येथे जाहीर सभेत बोलताना असं म्हटलं आहे की, '१०० कोटीवर १५ कोटी भारी पडतील,' असं वारिस पठाण म्हणाले. दरम्यान, त्यांनी आपल्या भाषणात थेट कोणाचेही नाव घेतले नाही. पण ज्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं तेव्हा असदुद्दीन ओवेसी हे देखील मंचावर उपस्थित होते.

 

 

एका जाहीर सभेत बोलताना पठाण म्हणाले की, आता आपण विटांचे उत्तर दगडाने द्यायला शिकलो आहोत. परंतु लक्षात ठेवा की आपल्याला एकत्र चालणं आवश्यक आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळवावं लागेल. जे मागून मिळत नाही ते हिसकावून घ्यावं लागतं हे लक्षात ठेवा. आता वेळ आली आहे, आम्हाला असं म्हटलं जात की, आम्ही आई आणि बहिणींना पुढे पाठविले आहे. अरे आता तर फक्त वाघिणी बाहेर आल्या आहेत. तरी तुम्हाला घाम फुटला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा जरी आम्ही १५ कोटी असलो तरीही शंभर कोटींवरही भारी आहोत.  लक्षात ठेवा ही गोष्ट.' असं वक्तव्य वारिस पठाण यांनी केलं आहे. 

दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे जेव्हा वादंग निर्माण झाला तेव्हा वारिस पठाण यांनी सगळा दोष मीडियाला दिला आहे. 'आम्ही नेहमीच संविधानाबद्दल बोलतो आणि आम्ही घटनेविरूद्ध कोणतेही विधान केलेले नाही. माझं वक्तव्य मीडियाने ट्विस्ट केलं आहे.' ते पुढे असंही म्हणाले की, 'आमच्या पक्षाचा नेहमी एकच अजेंडा असतो, तो म्हणजे विकास. त्यामुळे मी माझ्या विधानावर ठाम आहे. मी जे काही बोललो ते घटनेच्या कार्यक्षेत्रात राहूनच बोललो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी