वांद्रे स्टेशनबाहेर हजारो मजुरांची गर्दी, पोलिसांकडून लाठीचार्ज

मुंबई
पूजा विचारे
Updated Apr 14, 2020 | 19:49 IST

मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली आहे.  नागरिकांकडून आपल्या मूळ गावाकडे परत जाण्यासाठी रेल्वेगाडीची मागणी करण्यात आली. वांद्रे रेल्वे स्टेशनच्या बाहेर गर्दी जमली होती.

 Bandra stn
वांद्रे स्टेशनबाहेर हजारोंची गर्दी, पोलिसांकडून लाठीचार्ज  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  •  मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली आहे.
  • आज दुपारी वांद्रे पश्चिम परिसरात स्टेशनबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती.
  •  नागरिकांकडून आपल्या मूळ गावाकडे परत जाण्यासाठी रेल्वेगाडीची मागणी करण्यात आली.

मुंबईः  मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली आहे. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर आज दुपारी वांद्रे पश्चिम परिसरात स्टेशनबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती.  नागरिकांकडून आपल्या मूळ गावाकडे परत जाण्यासाठी रेल्वेगाडीची मागणी करण्यात आली. वांद्रे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जामा मशिदीच्या जवळ ही गर्दी जमली होती.

वांद्रेमध्ये भागात बस डेपोजवळ जमा झालेल्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यामुळे वांद्रे येथील परिस्थिती चिघळल्याचं दिसत आहे. आम्हाला आमच्या घरी सोडा अशी येथे जमलेल्या नागरिकांची, मजुरांची मागणी होती. याठिकाणी जमलेले जास्तीत जास्त लोक कामानिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मुंबईत आलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही गर्दी याठिकाणी कशी जमली याचा तपास पोलीस करत आहेत.

वांद्रा येथे हजारोच्या संख्येने जमा झालेले कामगार जवळच्याच वस्तीमध्ये राहत होते, अशी माहिती मिळत आहे. मागील अनेक दिवसांपासून ते येथेच राहत होते. या संपूर्ण प्रकाराची मिळताच स्थानिक नेते आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना गर्दीला समजावण्याचा प्रयत्न केला.  पोलीस आणि नेत्यांच्या आवाहनानंतर काही वेळात गर्दी ओसरली. मात्र मुंबईतील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आणि अशा स्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी रस्त्यावर येणे गंभीर बाब आहे. सध्या ही परिस्थिती आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

या परिस्थितीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.  केंद्रांने या मजुरांना त्यांच्या घराकडे पाठवण्याची सोय न केल्यामुळे आजची वांद्रे येथील घटना किंवा सुरतमधील घटना घडल्याचं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. त्यांना अन्न किंवा निवारा नको आहे तर त्यांनी घरी जायचं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी