Coronavirus medicine: महाराष्टात 'या' औषधांसाठी आधार कार्ड बंधनकारक, जाणून घ्या काय आहे कारण

मुंबई
Updated Jul 11, 2020 | 23:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Remdesivir, Tocilizumab coronavirus medicine: महाराष्टात या औषधांचा काळाबाजार वाढला आहे. कोविड १९ च्या रुग्णांवर या औषधाचे गुणकारी परिणाम दिसत आहेत.

Covid-19 medicines, Aadhar mandatory for certain medicines in Maharashtra
(प्रातिनिधीक फोटो) महाराष्टात 'या' औषधांसाठी आधार कार्ड बंधनकारक 

थोडं पण कामाचं

  • महाराष्टात रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांचा काळाबाजार वाढला आहे
  • सरकारने डॉक्टरांचे प्रिस्किप्शन आणि आधारकार्ड केले सक्तीचे
  • या दोन्ही औषधांचे कोविड १९च्या रुग्णांवर चांगले परिणाम दिसले आहेत

Remdesivir, Tocilizumab: कोरोनाच्या (Corona) काळातही काळाबाजार करणारे थांबलेले नाहीयेत. देशाच्या वेगवेगळ्या भागातून मास्क (Mask), सॅनिटायजर (Sanitizer) व कोरोनाशी संबंधित औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फूड आणि ड्रग डिपार्टमेंट आणि मुंबई पोलिसांशी बैठक घेऊन रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांच्या उपलब्धतेवर भर दिला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शुक्रवारी अन्न आणि औषध प्रशासनाने एक सर्क्युलर काढले आहे त्यानुसार कोरोनावर गुणकारी असलेल्या औषधांच्या खरेदीसाठी आधार कार्ड, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, सहमती फॉर्म आणि कोविड १९ पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवणे अनिवार्य केले आहे. जेणेकरुन औषधांचा काळाबाजार होणार नाही. या औषधांचा काळाबाजार होत असल्यास अन्न व औषध प्रशासन अधिकारी व पोलिसांमार्फत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पोलीस मदत देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

काळाबाजार होत असल्याने निर्णय

ज्यांना या औषधांची गरज नाही असे लोक ही औषधे खरेदी करून ती जास्त किंमतीने विकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता ही औषधे खरेदी करण्यासाठी कागदपत्रे अनिवार्य केली आहेत ज्यामुळे औषधांची विक्री आणि त्याचा उपयोग या सर्वांचं ट्रॅकिंग करुन माहिती ठेवण्यात येईल. यासोबत एफडीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, खरेदी आणि विक्रीच्या नोंदींमध्ये कसलीही तफावत नाहीये.

औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध

रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, ही औषधे महाराष्ट्रभर अधिक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

या औषधांचे वितरण काही ठराविक वितरकांकडून केले जाते, त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. ती टाळण्यासाठी या औषधाची विक्री अधिक वितरकांद्वारे करण्याच्या सूचना डॉ. शिंगणे यांनी संबंधित कंपनीला दिल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी