Aaditya Thackeray to resign as MLA? : मुंबई : आदित्य ठाकरे लवकरच विधानसभेतील आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानानंतर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे आदित्य ठाकरे राजीनामा देतील, अशी चर्चा आहे.
शिंदे सरकारने दिलेले उमेदवार आणि भाजपचे आमदार असलेले राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष झाले. यानंतर विधीमंडळ सचिवालयाने शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या गटनेते आणि प्रतोद यांच्याशी संबंधित दाव्यांची समीक्षा केली. समीक्षेअंती विधीमंडळ सचिवालयाने एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आणि भरत गोगावले हे शिवसेनेचे प्रतोद असल्याचा निर्वाळा देणारे पत्र एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांना दिले.
विधीमंडळ सचिवालयाने दिलेल्या पत्रामुळे विधानसभेत प्रतोद भरत गोगावले यांनी काढलेला पक्षादेश अर्थात व्हिप शिवसेनेच्या सर्व म्हणजेच ५५ आमदारांना लागू आहे. आदित्य ठाकरे आणि इतर १४ ते १५ आमदार अद्याप उद्धव ठाकरे यांच्या गटात आहेत. या आमदारांनी गोगावले यांनी काढलेल्या व्हिपचे उल्लंघन केले तर संबंधितांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे. अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी संबंधित आमदारांपुढे व्हिपचे पालन करणे किंवा राजीनामा देणे हे दोनच पर्याय आहेत. यामुळेच आदित्य ठाकरे विधानसभेतील आमदारकीचा राजीनामा देणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत राहून सरकार चालवू नये अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. यानंतर एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असे राजकीय चित्र निर्माण झाले. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची संख्या वाढू लागल्याचे पाहून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा आणि विधानपरिषदेतील आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर पक्षाचे संघटनात्मक सामर्थ्य वाढविण्यासाठी पुन्हा शिवसेना भवनात बसणार असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी आदित्य ठाकरे पण वडिलांचा कित्ता गिरवत आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.