Ketaki Chitale : मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. एक कविता शेअर करून केतकीने शरद पवार यांची नरकात जायची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. तसेच या पोस्टमध्ये पवारांच्या कर्करोगावरही वाईट भाषेत लिहिण्यात आले आहे. ही पोस्ट व्हायरल झाली असून त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केतकीवर टीका केली असून ठाण्यात केतकीविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी जवाहर राठोड यांची पाथरवाट ही कविता वाचून दाखवली. या कवितेत आमच्या छिन्नी आणि हातोड्यांनी एकदा तर कमाल केली, पाषाणातून वेरूळ, अजिंठा कोरली गेली,उद्ध्वस्त झालेल्या आमच्या आयुष्याच्या आरशातून शिल्पाचं सौंदर्य तुम्ही पाहता अन् म्हणता. वा! वाहवा! बहुत खूबसुरत! तुमच्या ब्रह्म, विष्णू, महेशाला लक्ष्मी अन् सरस्वतीला आम्हीच रुपडं दिलंय. आता तुम्ही खरं सांगा ब्रह्मदेव आमचा निर्माता की आम्हीच ब्रह्मदेवाचे पिता? असा उल्लेख होता. यावर भाजपने आक्षेप घेत पवारांनी ब्रम्हदेवाचा बाप काढला म्हणून टीका केली. त्यावर वकील नितीन भावे यांनी शरद पवार यांच्या टीकात्मक पोस्ट लिहिली होती. केतकी चितळेने ही पोस्ट आपल्या फेसबुक प्रोफाईलवर शेअर केली. ती पोस्ट अशी आहे की,
तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
केतकी चितळेच्या या पोस्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केतकीवर टीका केली आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगार यांनी अशाच प्रकारे एक पोस्ट लिहून केतकीवर टीका केली आहे.
केतकीच्या पोस्टवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी ठाण्यातील कळवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून केतकीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.