Eknath Shinde : मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातून बंडखोरी केली आहे. तसेच भाजपसोबत युती करण्याची मागणीही एकनाथ शिंदे यांनी केली आहे. असे असले तरी सध्या बहुमताचा आकडा महत्त्वाचा आहे. महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचे पाठबळ होते. आता एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे किमान ४० आमदार त्यांच्या गटात आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० आमदार असल्याने ते वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे किमान ४० आमदारांचा पाठिंबा आहे. त्यात राज्यमंत्री अब्दुल सत्तर, शंभूराजे देसाई, प्रकाश अबिटकर, संजय राठोड, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, महेंद्र दळवी, विश्वनाथ भोईल, भरत गोगावले, संदीपान भूमरे, प्रताप सरनाईक, शाहजी पाटील, तानाजी सावंत, शांताराम मोरे, श्रिनिवास वणगा, संजय शीरसाठ, अनिल बाबर, बालाजी किन्हीकर, यामिनी जाधव, किशोर पाटील, गुलाबराव पाटील, रमेश बोरनारे आणि उदय राजपुत यांच्यासह अनेक आमदार शिंदे यांच्या सोबत आहेत किंवा संपर्कात आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक बंडखोर आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संपर्कात हे आमदार आहेत. सूरतमध्ये हे आमदार पोहोचले असून पाटील यांच्या देखरेखीखाली हे आमदार हॉटेलमध्ये थांबले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना संपर्कात ठेवले आहेत. तसेच शिवसेनेनेही उर्वरित आमदारांची बैठक बोलावली आहे.
शिवसेनेकडे सध्या ५५, राष्ट्रवादीकडे ५३ तर काँग्रेसकडे ४४आमदारांचे संख्याबळ आहे. अपक्ष आणि छोट्या मोठ्य पक्षांचा पाठिंबा मिळून महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचे पाठबळ आहे. सध्या भाजपकडे १०६ आमदार आहेत. भाजपला एका अपक्षाने पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० आमदारांचा पाठिंबा आहे. या आमदारांनी आपला गट स्थापन करून भाजपला समर्थन दिल्यास महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल आणि भाजपचे सरकार स्थापन होईल.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.